Kuch Kuch Hota Hai, Kajol : १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा तेव्हा लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता. 'कुछ कुछ होता है राहुल तुम नहीं समझोगे', 'हम एक बार जिते है, एक बार मरते है और प्यार भी एक बार होता है...,' असे मधाळ संवाद, थिरकायला भाग पाडतील अशी गाणी आणि राहुल, टीना व अंजली यांची जबरदस्त केमिस्ट्री असा हा सिनेमा बॉलिवूडचा माईलस्टोन ठरला. या सिनेमात शाहरूख व काजोल लीड रोलमध्ये होते तर सलमान खान व राणी मुखर्जी सपोर्टिंग ॲक्टर्स.
ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमाचा क्लायमॅक्स आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच. राहुल व अंजली मैत्रीपलिकडे जाऊन एकमेकांचं प्रेम स्वीकारतात आणि नेहमीसाठी एक होतात. याचदरम्यान अंजलीसोबत लग्न करण्यासाठी आलेला अमन स्वत:हून त्यांच्या मार्गातून दूर हटतो. हा क्लायमॅक्स चित्रपटाला साजेसा आहे. पण काजोलला कदाचित हा क्लायमॅक्स मनापासून आवडलेला नाही. 'कुछ कुछ होता है'च्या रिलीजच्या २४ वर्षांनंतर काजोलने एक मजेशीर खुलासा केला आहे.
'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत काजोल या सिनेमाबद्दल बोलली. 'कुछ कुछ होता है'ची स्क्रीप्ट तू लिहिली असतील तर तू राहुल व अमन यांच्यापैकी कुणाची निवड केली असती? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, मला माझ्या मतानुसार अंजलीचं कॅरेक्टर दाखवायचं असतं तर तिने कधीच साडी नेसली नसती. ती कॉलेज लाईफसारखीच टॉम बॉय बनून राहिली असती. माझ्या मतानुसार स्क्रिप्ट लिहिली गेली असती तर मी राहुलशी नाही तर सलमान म्हणजे अमनशी लग्न केलं असतं. पण चित्रपटात अंजलीकडे राहुलकडे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे जे शक्य होतं, तेच घडलं.'कुछ कुछ होता है'मध्ये काजोलची दोन रूपं पाहायला मिळाली होती. कॉलेज लाईफमध्ये ती अगदी टॉम बॉय टाईपची मुलगी असते. पण ८ वर्षानंतर ती लांब केसांत, साडीत दिसते.
'कुछ कुछ होता है' पॉलिटिकली इनकरेक्ट२०१९ साली दिलेल्या एका मुलाखतीत 'कुछ कुछ होता है'चा दिग्दर्शक करण जोहर आपल्या या सिनेमाबद्दल बोलला होता. 'कुछ कुछ होता है' हा एक पॉलिटिकली इनकरेक्ट सिनेमा असल्याचं त्याने म्हटलं होतं. यामागचं कारणही त्याने सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'कुछ कुछ होता है' रिलीज झाल्यानंतर एकदिवस मला शबाना आझमी यांचा फोन आला. त्या प्रचंड रागात होत्या. तु हे काय दाखवलंय? मुलीचे केस लहान आहेत तर ती सुंदर, आकर्षक नाही आणि नंतर तिच मुलगी लांब केस आणि साडी नेसू लागली तर सुंदर दिसू लागते? तुला काय म्हणायचं आहे? असे त्यांनी मला खडसावून विचारलं. शबाना आझमीजींच्या त्या गोष्टी ऐकून मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती. मी त्यांची फोनवर माफीही मागितली होती.