बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत येणारी बहिणींची जोडी म्हणजे काजोल (kajol) आणि तनिषा मुखर्जी (Tanishaa mukerji). अभिनेत्री तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलींनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात काजोल तुफान लोकप्रिय झाली. तिने रुपेरी पडद्यासह आता ओटीटीदेखील गाजवायला सुरुवात केली आहे. परंतु, तनिषाला मात्र सिनेमातही फारसं यश मिळालं नाही. अलिकडेच ती 'झलक दिखला जा 11' मध्ये दिसली होती. बऱ्याचदा तनिषा आणि काजोल या दोघींची त्यांच्या करिअरवरुन तुलना केली जाते. यावर, तिने नुकतंच मौन सोडलं आहे.
तनिषाने अलिकडेच 'द इंडियन एक्स्प्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने काजोलसोबत सतत होणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं. "माझी कायम तिच्यासोबत तुलना केली जाते या गोष्टीचा मला जराही त्रास होत नाही. माझी तिच्यासोबत कधीच तुलना होऊ शकत नाही. किंवा, मी माझी आणि तिची तुलना करु शकत नाही. इतकंच कशाला इतर अभिनेत्रींसोबतही मी माझी तुलना करणार नाही. मुळात मी माझी माझ्या बहिणीसोबतच तुलना कशी काय करेन? प्रत्येक कलाकार किंवा स्टारचा एक प्रवास असतो असं मला वाटतं", असं तनिषा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी हे मान्य करते की माझं करिअर तिच्या (काजोल) इतकं चांगलं झालं नाही. पण, तिने वयाच्या १६ व्या वर्षापासूनच करिअरची सुरुवात केली. मला या गोष्टीचा एका अर्थाने फायदा पण झाला कारण ती माझ्या आधीपासून इंडस्ट्रीमध्ये होती. उलट मी तिचे आभारच मानेन कारण, तिच्यामुळे माझा प्रवास सुखकर झाला. माझं करिअर आरामात सुरु झालं. मला जास्त काम करावंच लागलं नाही. मला वाटतं लोकांना फक्त तुलनाच करायला आवडतं. आणि, मी त्यांच्या अशा जगात रहात नाही जिथे तुलना केली जाते."
दरम्यान, तनिषाने Sssshhh या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती टँगो चार्ली, तुम मिलो तो सही , कोड नेम अब्दुल यांसारख्या सिनेमात झळकली. अलिकडेच ती बिग बॉस आणि खतरों के खिलाडी 7 या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती.