अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कल्कि 2898 एडी' या बिग बजेट बॉलिवूड सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी (२७ जून) हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. पहिल्याच दिवशी 'कल्कि 2898 एडी'चे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. तर दुसऱ्या दिवशीही 'कल्कि 2898 एडी'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनाच्या दिवशी 'कल्कि 2898 एडी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ९५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण, असं असलं तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. दुसऱ्या दिवशी 'कल्कि 2898 एडी' सिनेमाच्या कमाईत ३०-४० कोटींची घट झाली आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'कल्कि 2898 एडी' सिनेमाने दुसऱ्या दिवशी ५४ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने केजीएफ २, जवान, गदर २, बाहुबली २ सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. केजीएफ २ सिनेमाने दुसऱ्या दिवशी ४६.७९ कोटी तर जवानने ४६.२३ कोटींची कमाई केली होती. गदर २ ने ४३.०८ कोटी तर बाहुबली २ ने ४०.५ कोटींचा गल्ला जमवला होता. ६०० कोटींचं बजेट असलेल्या'कल्कि 2898 एडी' सिनेमाने दोन दिवसांत १४९.३ कोटींचा बिजनेस केला आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्कि 2898 एडी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. एका महाकाव्यावर हा सिनेमा आधारित आहे. ६०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात दीपिका, अमिताभ बच्चन, प्रभास यांच्याबरोबर कमल हसन, दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'कल्कि 2898 एडी' सिनेमा देशात तब्बल ४५०० ते ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला गेला आहे. हिंदीबरोबरच तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.