महल, पाकीजा, रजिया सुलतान अशा भव्य कलाकृती पडद्यावर जिवंत करणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता -दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा आज म्हणजे 17 जानेवारीला वाढदिवस. आज कमाल अमरोही आपल्यात नाहीत. पण भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. हिंदी सिनेमा गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक अशीही त्यांची ओळख होती. कमाल अमरोही यांनी आपल्या अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये केवळ पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यापैकी एक होता, ‘पाकिजा’. मीना कुमारीच्या अभिनयाने सजलेल्या ‘पाकिजा’कडे एक चित्रपट म्हणून नव्हे तर एक अमर कलाकृती म्हणून बघितले जाते. पण हीच अमर कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागलीत. होय, 1958 साली या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि 1972 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचे मुख्य कारण होते कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली ‘पाकिजा’ची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतरचा तलाक.
कमाल यांनी 16 वर्षांच्या मीना कुमारीला ‘महल’ या सिनेमात संधीच दिली नाही तर तिला सुपरस्टार ही ओळखही दिली. पुढे मीना कुमारी कमाल अमरोही यांच्या प्रेमात जणू वेडी झाली होती.
ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली तर मोसंबीच्या ज्युसने. होय, मीना कुमारी एका दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आणि तिला रूग्णालयात भरती करण्यात आले. जखमी मीना कुमारीला पाहायला कमाल अमरोही रूग्णालयात पोहोचले. यावेळी मीना कुमारीच्या लहान बहिणीने तिची कमाल यांच्याकडे तक्रार केली. आपा तो मोसंबी का ज्यूस नहीं पी रहीं है, असे बहिणीने सांगितले. यावर कमाल यांनी केवळ नजर वर करून मीना कुमारींकडे पाहिले आणि काय कमाल, मीना कुमारीने एका घोटात मोसंबीचा ज्यूस संपवला. यानंतर कमाल दर आठवड्याला मुंबईत पुण्याला मीना कुमारीला भेटायला येऊ लागले. इथून या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.
कमाल यांची आधीच दोन लग्ने झाली होती. ते तीन मुलांचे बाप होते. अशात मीना कुमारी व त्यांचे नाते मीनाच्या वडिलांना मान्य नव्हते. पण मीना कुमारीला जगाची पर्वा नव्हती. त्या अपघातानंतर मीना कुमारी आपल्या बहिणीसोबत रोज एका मसाज क्लिनिकमध्ये जायची. 14 फेब्रुवारी 1952 रोजी दोघी बहिणींना वडिलांनी क्लिनिकमध्ये सोडून दिले. पण मीना कुमारी तिथून थेट कमाल अमरोहींजवळ पोहोचली. काजी आधीच तयार होता. अगदी दोन तासांत दोघांचा निकाह झाला. अर्थात 1964 येईपर्यंत हे जोडपे विभक्त झाले होते. त्यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले होते.
कमाल अमरोही यांच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. अशावेळी मीना कुमारी त्यांच्या प्रेमात पडली होती. कमाल अमरोही हे जिद्दी, जातिवंत कलाकार होते. त्यांच्या कामात कोणी लुडबूड केलेली त्यांना अजिबात सहन होत नसे. कमाल अमरोहींनी त्यांची पहिली पत्नी आणि मुलांना गावी पाठवून मीनाकुमारीसोबत संसार सुरु केला.