Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलीबद्दल बोलाल तर...’, काम्या पंजाबी ट्रोलर्सवर संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:51 IST

Kamya Punjabi : माझी मुलगी माझं आयुष्य आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही भुंकू शकता. मला पर्वा नाही. पण तुम्ही माझ्या मुलीबद्दल काही बोलणार असाल, तर...; वाचा काम्या पंजाबी काय म्हणाली?

टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक काम्या पंजाबी (Kamya Punjabi ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. प्रत्येक मुद्यांवर ती अगदी बिनधास्त बोलते. स्वत:चं मत मांडते आणि यामुळे अनेकदा ट्रोलही होते. अलीकडे रितेश देशमुख व जिनीलिया डिसूजा यांच्या टॉक शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या काम्याने खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केलेत. ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंग या विषयावरही ती बोलली. पहिलं लग्न तुटल्यानंतर लोकांनी कशापद्धतीनं ट्रोल केलं, दुस-या रिलेशनशिपमध्ये असताना लोक काय काय बोलले, हे तिनं सांगितलं.  

 ती म्हणाली, ‘माझं पहिलं लग्न मोडलं. मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. मी घटस्फोट घेतला आणि लोकांनी मला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केलं. मी दुस-या रिलेशनशिपमध्ये असताना लोकांनी मी घटस्फोटीत असल्यावरून माझी खिल्ली उडवली. तुझा घटस्फोट झालायं. तू म्हातारी आहेस, नवीन प्रियकराकडे फार दिवस टिकणार नाही, असं काय काय लोक म्हणाले. माझ्या 5 वर्षांच्या मुलीलाही त्यांनी सोडं नाही. तिलाही त्यांनी ट्रोल केलं. आज माझी मुलगी 11 वर्षांची आहे आणि अजूनही लोक तिला ट्रोल करतात. माझ्याबद्दल जे काही बोलायचं ते बोला. जितकं भुंकायचं तेवढं भुंका, मला फरक पडत नाही.  पण गोष्ट जेव्हा माझ्या मुलीची असेल तेव्हा मी जाऊन त्यांचा गळा चिरून टाकेन. मी ते खपवून घेणार नाही.’

काम्या पंजाबीने 2001 साली अ‍ॅक्टिंग करिअरची डेब्यू केली होती. दोन दशकांच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये तिने कहता है दिल, क्यूं होता है प्यार, पिया का घर, अस्तित्व - एक प्रेम कहानी, वो रहने वाली महलों की, बनूं मैं तेरी दुल्हन अशा अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. बिग बॉस सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अन्य काही रिअ‍ॅलिटी शोदेखील तिने केलेत.

टॅग्स :काम्या पंजाबी