नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घाेषणा झाली असून अभिनेत्री कंगना रणाैत हिला सर्वाेत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मनाेज बाजपेयी आणि धनुष यांना सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. ‘मर्कर लाॅयन ऑफ द अरेबियन सी’ हा सर्वाेत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर सुशांत सिंह राजपूतचा ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’ या गाण्यासाठी बी. पार्क यांना सर्वाेत्कृष्ट पार्श्वगायनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘बार्डाे’ हा सर्वाेत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. तसेच या चित्रपटासाठी सावनी रवींद्र हिला सर्वाेत्कृष्ट पार्श्वगायनाचाही पुरस्कार मिळाला आहे. तिला प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ताजमहल’ हा राष्ट्रीय एकात्मतेच्या श्रेणीतील सर्वाेत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घाेषणा दिल्लीत झाली. पुरस्कार गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर हाेणार हाेते. मात्र काेराेना महामारीमुळे ते अनिश्चित काळासाठी लांबविण्यात आले हाेते. अखेर साेमवारी त्यांची घाेषणा झाली. कंगना रणाैतची ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वाेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली. अखेरच्या श्वासापर्यंत प्रचंड शाैर्य दाखवून इंग्रजांशी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट आहे. तर ‘पंगा’मध्ये कंगनाने जया निगम या महिला कबड्डीपटूची भूमिका साकारली आहे. कंगनाला यापूर्वी २०१४ मध्ये ‘क्वीन’ आणि २०१५ मध्ये ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटांसाठी सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला हाेता. तसेच २००८ मध्ये मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅशन’ या चित्रपटासाठी ती सर्वाेत्तम सहाय्यक अभिनेत्री ठरली हाेती. सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘आनंदी गाेपाळ’ सर्वाेत्कृष्ट ठरला आहे. तसेच सर्वाेत्कृष्ट प्राॅडक्शन डिझाईनसाठीही या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.
मनाेज बाजपेयीला ‘भाेसले’ या चित्रपटासाठी आणि धनुष याला ‘असुरन’मधील अभिनयासाठी सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुस्कार जाहीर झाला. मनाेज बाजपेयीला यापूर्वी ‘सत्या’ चित्रपटासाठी सर्वाेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला हाेता. ‘भाेसले’ हा मुंबईतील हवालदाराचे आयुष्य आणि संघर्षावर आधारित चित्रपट आहे. तर ‘असुरन’ चित्रपटात शिवसॅमी आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. विजय सेतुपथीला सर्वाेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मराठीची छापमराठमाेळी अभिनेत्री पल्लवी जाेशीला ‘द ताश्कंद फाईल्स’ चित्रपटात आएशा अली शाह यांच्या भूमिकेसाठी सर्वाेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. पल्लवीचे पती विवेक अग्निहाेत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. स्पेशल मेन्शन विभागातील पुरस्कारांमध्ये ‘लता भगवान करे’, ‘पिकासू’ यांचाही समावेश आहे.