ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धीत उपोषणास बसणार होते. मात्र त्याआधीच अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. अर्थात मला याचे दु:ख नाही. कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा ‘सिमरन’सिनेमा केला होता, असे हंसल मेहता म्हणाले होते. या प्रतिक्रियेत त्यांनी ‘सिमरन’ या सिनेमाचा उल्लेख केला होता. होय, कंगना राणौतचा हाच तो सिनेमा. साहजिकच हंसल मेहता ‘सिमरन’चा उल्लेख करताच कंगनाला मिरची झोंबणार आणि तिचे ट्वीट पडणार.
अपेक्षेनुसार, कंगनाने हंसल मेहतांना रिप्लाय देत ट्वीट केले आहे. ‘चांगले आहे सर. मी तुमच्या पाठीशी उभी राहिली आणि आता तुम्ही असे बोलताय. जणू मी ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का...’ गातेय असे वाटतेय,’ असे ट्वीट कंगनाने केले.
विशेष म्हणजे हंसल मेहता यांनी लगेच कंगनाच्या या ट्वीटला उत्तर दिले. ‘सर्वप्रथम मी केलेले याआधीचे ट्वीट तुझ्यासाठी नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे, सिमरन बनवल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे मी खूप दुखावलो गेलो. यामुळे हा सिनेमा बनवण्याचा पश्चाताप मला झाला होता,’असे त्यांनी लिहिले.हंसल मेहता यांनी 2017 मध्ये ‘सिमरन’ हा सिनेमा बनवला होता. शिवाय नंतर या सिनेमातून अंग काढून घेतले होते. या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनी केलेल्या दाव्यानुसार, हंसल मेहता यांनी मध्येच सिनेमा सोडल्यानंतर कंगनानेच दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. प्रोजेक्ट मध्येच सोडल्याबद्दल कंगनाने हंसल मेहता यांना ‘कायर’ म्हटले होते.यापूर्वी सुद्धा एका मुलाखतीत हंसल मेहता यांनी ‘सिमरन’ बनवणे माझी चूक होती, असे म्हटले होते. हा सिनेमा माझ्या करिअरमधील चूक होती. मी त्यामुळे दु:खी आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यनंतर मला थेरपी घ्यावी लागली होती. माझे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते, असे ते म्हणाले होते.