कंगना राणौतला लोकांनी डोक्यावर घेतले. अगदी बॉलिवूडची ‘क्वीन’ बनवले. पण सध्या कंगना आपल्याच तोºयात वावरताना दिसते. दरदिवशी नवा दावा, नवी तुलना असे काय करत स्वत:चीच पाठ थोपटून घेते. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:ची तुलना टॉम क्रूजसोबत केली होती. त्याआधी हॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मेरिल स्ट्रीपसोबतही तिने तुलना केली होती. आता कंगनाने काय केले तर, श्रीदेवींसोबत स्वत:ची तुलना केली. श्रीदेवींनंतर मीच, असे तिने म्हटले आहे.
‘तनु वेड्स मनु’ या सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून कंगनाने एक ट्वीट केले. यात तिने स्वत:ची श्रीदेवींसोबत तुलना केली. ‘ करिअरच्या सुरुवातीला मी अतिशय निरुत्साही आणि विक्षिप्त भूमिका साकारल्या. मात्र, या सिनेमाने (तनु वेड्स मनु) माझ्या करिअरची दिशाच बदलली. या सिनेमाने मला मुख्य प्रवाहात एन्ट्री दिली. ती सुद्धा कॉमेडीसोबत. क्वीन आणि दत्तोने माझ्या कॉमिक टायमिंगला वेगळ्या उंचीवर नेले आणि मी श्रीदेवी यांच्यानंतर कॉमेडी करणारी एकमेव अभिनेत्री ठरले,’असे कंगनाने आपल्या या ट्वीटमध्ये लिहिले.
‘ या सिनेमासाठी आनंद एल राय आणि लेखक हिमांशू शर्मा यांचे आभार मानते. जेव्हा ते हा चित्रपट घेऊन माझ्याजवळ आले तेव्हा मी त्यांचे करिअर बनवू शकते, असे मला वाटले होते. मात्र त्यांनीच माझे करिअर बनवले. कोणता चित्रपट चालेल आणि कोणता नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. सगळा नशीबाचा खेळ आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात, याचा आनंद आहे,’ असे दुसरे ट्वीट तिने केले.
अन् ट्रोल झाली....
श्रीदेवीनंतर मीच..., असे कंगना म्हणाली आणि पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. तुझा हा दावा म्हणजे, मोठा विनोद असल्याचे एका युजरने म्हटले. भलामोठा जोक, श्रीदेवीसोबत स्वत:ची तुलना करू नकोस, तिची उंची तू कधीच गाठू शकणार नाहीस, असे एका युजरने तिला सुनावले.
कॉमेडियन भारतीही तुझ्यापेक्षा चांगली आहे, अशा शब्दात एका युजरने तिला डिवचले. तर अन्य एका युजरने थेट ‘तू कधी माधुरी दीक्षितचं नाव ऐकलं आहेस का?’, असा सवाल करत कंगनाची मजा घेतली.