बॉलिवूडची क्वीन आणि नवनिर्वाचित खासदार असलेल्या कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या सिनेमातून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य करण्यात आलं आहे. १९७५ सालचा आणीबाणीचा काळ यातून दाखविण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक प्रतिक्षेत असलेल्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'इमर्जन्सी' सिनेमाचा २.५४ मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. यामध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयाचा लेखाजोगा मांडण्यात आल्याचं दिसत आहे. त्यांच्या या निर्णयाचा देशावर आणि त्यातील जनतेवर काय परिणाम झाले, त्याचे नेमके कोणते पडसाद उमटले, याबाबतही सिनेमातून भाष्य करण्यात आल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सिनेमातील काही दमदार संवादांची झलक पाहायला मिळत आहे. 'इमर्जन्सी' सिनेमाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या सिनेमात कंगना राणौत हिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तर अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, सतिश कौशिक, भूमिका चावला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेतं. या सिनेमाचं दिग्दर्शनही कंगनानेच केलं आहे. येत्या ६ सप्टेंबरला कंगनाचा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.