कंगना राणौतचा (kangana Ranaut) ‘थलायवी’ (Thalaivii ) हा सिनेमा नुकताच देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाकडे सुरूवातीपासून सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कंगनाचा सिनेमा म्हणून अपेक्षा होत्याच. शिवाय जयललितांच्या आयुष्यावरचा चित्रपट म्हटल्यावर अपेक्षा आणखीच वाढल्या होत्या. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय कमाल दाखवतो, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष होतं. सिनेमातील कंगनाच्या कामाचं भरभरून कौतुक झालं. पण बॉक्स ऑफिसचं म्हणालं (Thalaivii Box Office Collection) तर हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवशीची कमाई तर कंगनाच्या या सिनेमाने अक्षय कुमारच्या ‘बेटबॉटम’पेक्षाही कमी गल्ला जमवला.
हिंदी, तामिळ व तेलगू भाषेत रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त 1.44 कोटींची कमाई केली. यात हिंदी व्हर्जनचा वाटा केवळ 25 लाखांचा होता. वीकेंडला ‘थलायवी’ चांगला गल्ला जमवेल, ही अपेक्षाही फोल ठरली. पण पहिल्या वीकेंडला या सिनेमाने केवळ 4.86 कोटींचा गल्ला जमवला. रिलीजनंतरच्या 3 दिवसांत चित्रपटाला 5 कोटींचाही टप्पा गाठता आला नाही.
फक्त चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचं तर ‘थलायवी’च्या हिंदी व्हर्जनने तीन दिवसांत फक्त 1 कोटींचा बिझनेस केला. पहिल्या दिवशी 25 लाख, शनिवारी 30 लाख आणि रविवारी 45 लाखांची कमाई झाली. ‘बेलबॉटम’सोबत तुलना केल्यास अक्षयच्या सिनेमाने पहिल्या वीकेंडला देशभरात 15 कोटींचा बिझनेस केला होता. म्हणजेच काय तर ‘थलायवी’ कमाईच्या बाबतीत ‘बेलबॉटम’च्या जवळपासही नव्हता. निश्चितपणे ‘थलायवी’वा कोरोनाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित न होणे, हेही ‘थलायवी’च्या कमी कमाईमागचं एक मोठं कारण असल्याचं मानलं जातंय. चित्रपटाच्या कमाईचा 30 टक्के वाटा महाराष्ट्रातून येतो, असं जाणकार सांगतात. त्यामुळे कंगनाला याचाही जोरदार फटका बसला आहे.‘थलायवी’च्या बॉक्स ऑफिसवर खराब प्रदर्शनामागे चित्रपटगृहांची संख्या हेही एक कारण मानलं जातंय. नॉनमेट्रो शहरात आणि गावात ‘थलायवी’चा पाहिजे तितका प्रचार झालाच नाही, यामुळेही प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं जाणकारांचं मत आहे.