कंगना राणौत (Kangana Ranaut) बोलली की त्याची हेडलाईन होणार, हे ठरलेलं. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता ती अशाच एका वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. साऊथ इंडस्ट्री व साऊथ स्टार्सबद्दल (South film industry)कंगनाने एक मोठं विधान केलं आहे. साऊथ स्टार्सची इतकी हवा का आहे? याची काही कारणं कंगनाने सांगितली आहेत. शिवाय यानिमित्ताने बॉलिवूडला अप्रत्यक्षपणे सल्लाही दिला आहे.
कंगनाने इन्स्टा स्टोरीमध्ये साऊथ स्टार्स व साऊथ सिनेमांबद्दल मत मांडले आहे. यात तिने केजीएफ 2 व पुष्पा या साऊथच्या तुफान गाजलेल्या सिनेमांचाही उल्लेख केला आहे.
ती लिहिते, ‘साऊथ कंटेट व सुपरस्टार्सची इतकी क्रेझ आहे, यामागे काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, ते भारतीय संस्कृतीशी जुळलेले आहेत. दुसरे कारण म्हणजे, नाती व कुटुंबाबद्दल ते पारंपरिक मतांचे आहेत. पाश्चिमात्य विचारांचे नाहीत. तिसरं कारणं म्हणजे, त्यांची चिकाटी आणि काम करण्याची पद्धत एकदम युनिक आहे.’
पोस्टच्या शेवटी तिने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री दोन्हींना सल्ला दिला आहे. त्यांनी स्वत: भ्रष्ट करण्याची परवानगी बॉलिवूडला देता कामा नये, असं तिनं लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिने पुष्पा 2 आणि केजीएफ 2 बद्दलचं एक आर्टिकलही शेअर केलं आहे. या दोन चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
बॉलिवूड नंबर 3 वर!!
अलीकडे साऊथ सिनेमांची क्रेझ प्रचंड वाढली आहे.रिपोर्टनुसार, 2021 मध्ये टॉलिवूडच्या सिनेमांनी वर्ल्ड वाईड सुमारे 1300 कोटींची कमाई केली आणि यासोबतच टॉलिवूड देशाची नंबर 1 फिल्म इंडस्ट्री बनली. कॉलिवूड दुसऱ्या क्रमांकाची सिने इंडस्ट्री ठरली. कॉलिवूडमध्ये धनुषच्या असुरन, कर्णन, मास्टर, जय भीम या सिनेमांनी विक्रमी कमाई केली.
आत्तापर्यंत बॉलिवूड हीच देशातील नंबर 1 ची फिल्म इंडस्ट्री होती. पण आता बॉलिवूड तिसऱ्या क्रमांकावर गेलं आहे. आंध्र प्रदेश बॉक्स ऑफिस सोशल मीडिया हँडलनुसार, 2021 मध्ये बॉलिवूडने एकूण 700 कोटींची कमाई केली. 2021 मध्ये अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सुपरहिट ठरला. मात्र अंतिम, सत्यमेव जयते 2, चंदीगड करे आशिकी यासारखे मोठे सिनेमे फार कमाल दाखवू श्कले नाहीत. रणवीर सिंगच्या ‘83’ या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या सिनेमाला प्रेक्षकांनी फार प्रतिसाद दिला नाही. कोरोना महामारीचा बॉलिवूडला मोठा फटका बसला आहे आणि निश्चित हे आकडे बॉलिवूडकरांचं टेन्शन वाढवणारे आहेत.