अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. हिमाचल प्रदेशमधील 'मंडी'ची ती खासदार आहे. कंगनाचं मनाली येथे घर आहे. नुकतंच तिला आलेलं घराचं विजेचं बिल पाहून धक्काच बसला. कंगनाला १ लाख रुपये लाईट बिल आलं आहे. यावरुन तिने हिमाचल प्रदेश राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. मंगळवारी मंडीमधील बल्ह विधानसभा क्षेत्रातील लोकांना संबोधित करताना कंगना म्हणाली,"या महिन्यात माझ्या मनालीतील घराचं विजेचं बिल १ लाख रुपये आलं. जेव्हा की मी तर तिथे राहतही नाही. इतरी दुर्दशा झाली आहे. आपण हे पाहत राहतो आणि आपल्यालाच लाज वाटते की हे नक्की चाललंय तरी काय? पण आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सगळे माझे बंधू भगिनी आहात, तुम्ही ग्राऊंडवर अतिशय कष्टाने काम करत आहात. आपल्या सर्वांचंच हे दायित्व आहे की आपण या देशाला, या प्रदेशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जावं. मी तर म्हणते हे लोक लांडगे आहेत आणि आपल्याला आपल्या प्रदेशाला त्यांच्या तावडीतून सोडवायचं आहे."
कंगना नुकतीच 'इमर्जन्सी' सिनेमात दिसली. या सिनेमातील भूमिकेसाठी तिचं खूप कौतुक झालं. यानंतर आता ती आर माधवनसोबत आगामी सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. यासोबत ती राजकारणातही सक्रीय आहे. खासदार म्हणून ती आपले कर्तव्य पार पाडत आहे.