Join us

'ढोंगी' म्हणत नेटकऱ्यांनी घेतली कंगना राणौतची शाळा, व्हायरल पोस्टमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 2:43 PM

भाजप खासदार व अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे.

भाजप खासदार व अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे. चंदीगढ विमानळावर कुलविंदर कौर नावाच्या एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने गुरुवारी (६ जून रोजी) कंगना रणौतच्या कानशिलात लगावली. शेतकरी आंदोलनाविरोधात कंगनाच्या वक्तव्याचा त्या महिलेच्या मनात राग होता. या घटनेवर राजकीय नेते व अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता कंगनाचं जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यावरुन अभिनेत्रीला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे. 

कंगनाची ही पोस्ट 2022 मधील आहे. जेव्हा ऑस्कर कार्यक्रमात क्रिस रॉकने विलच्या पत्नीची खिल्ली उडवली होती. त्यामुळे विल स्मिथ संतापला आणि त्याने स्टेजवर येत क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. यानंतर कंगनाने विल स्मिथच्या कृतीचे समर्थन केलं होतं. ऑस्कर 2022 दरम्यान घडलेल्या घटनेचा फोटो शेअर करताना कंगनानं म्हटलं होतं की, जर ती विलच्या जागी असती तर तिनेही असंच केलं असतं. पोस्टमध्ये कंगनाने लिहलं होतं, 'कोणत्याही मूर्ख व्यक्तीने माझ्या आईच्या किंवा बहिणीच्या आजाराची अशी खिल्ली उडवली. तर मीदेखील विल स्मिथप्रमाणे कानफडात देईल. खूप चांगलं पाऊल उचललं'.

आता जेव्हा आपल्या आईविरोधातील विधानावरुन संतापलेल्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने कंगनाच्या कानशिलात लगावली. तेव्हा कंगनाच्या जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी कंगनाला ढोंगी म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ही पोस्ट शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'विल स्मिथ आपल्या पत्नीची खिल्ली उडवणाऱ्या व्यक्तीला मारू शकतो. पण, अभिनेत्री एका महिलेच्या आईला १००-२०० रुपयांसाठी आंदोलनात सहभागी झालीये असे म्हणते. तेव्हा अभिनेत्रीला मारता येणार नाही का, असा सवाल त्याने केला. यासोबत 'त्याने ढोंगीपणालाही मर्यादा असते' असं लिहलं. इतरही काही नेटकऱ्यांनी कंगनावर दांभिकपणाचा आरोप केला. 

 

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडहॉलिवूडऑस्कर