बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आली आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणुक लढवणार आहे. कंगनाला तिकीट मिळताच काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर कंगनाने उर्मिला मांतोडकरबाबत २०२०मध्ये केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली होती. कंगनाने उर्मिलाला पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्यामुळे वादही झाला होता. आता पुन्हा याची चर्चा होत असल्याने कंगनाने याबाबत भाष्य केलं आहे.
"पॉर्नस्टार एक आक्षेपार्ह शब्द आहे का? नाही! मला नाही वाटत की हा एक आक्षेपार्ह शब्द आहे. हा एक असा शब्द आहे जो सामाजिक दृष्ट्या स्विकारला गेलेला नाही," असं कंगना टाइम्स नाऊ समिटमध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. पुढे सनी लिओनीचा उल्लेख करत कंगना म्हणाली, "आपल्या देशात जेवढा सन्मान पॉर्नस्टारला दिला जातो. तेवढा संपूर्ण जगात कोणाला मिळत नसेल. सनी लिओनीलाच विचारा. आपण पॉर्नस्टारला सामाजिकरित्या स्विकारलं आहे. पण, वेश्यांच्या बाबतीत अजूनही आपली मानसिकता बदललेली नाही. त्यांच्याकडे ग्लॅमर आणि पैसा आहे म्हणून का? आपण वेश्यांबरोबर पॉर्नस्टारसारखा व्यवहार करत नाही".
उर्मिला मातोंडकरला पॉर्नस्टार म्हणण्याबाबत कंगनाने स्पष्टीकरण दिलं. "मला उर्मिला यांच्यावर कमेंट करण्यासाठी सांगितलं गेलं होतं. भाजपा कोणत्या आधारावर मला राजकारणात घेण्याचा विचार करत आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. तेव्ही मी उत्तर दिलं होतं की कलेचे वेगवेगळे क्षेत्र आहे. जी कला केवळ तुम्हाला उत्तेजित करण्याच्या उद्देशाने बनवली जाते. त्याला आम्ही मासी आर्ट असं म्हणतो. तोदेखील कलेचा एक प्रकार आहे. पण, ही कला बौद्धिक कलेपेक्षा चांगली असू शकत नाही. मी स्वत:ला बॅलेन्स असलेल्या सिनेमा आर्टिस्टपैकी एक मानते. मी कधीच आयटम साँग केलेले नाहीत. मी फक्त एवढं म्हणाले होते की जर उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये जाऊ शकते तर मी तिच्यापेक्षा चांगलं काम केलं आहे," असंही कंगना म्हणाली.
उर्मिला मातोंडकरबाबत कंगनाने केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य
कंगनाने उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं. तिने उर्मिलाच्या स्ट्रगलची खिल्लीही उडवली होती. भाजपाचं तिकीट मिळवण्यासाठी उर्मिला प्रयत्न करत होती, असंही कंगनाने म्हटलं होतं. "उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही?" असं कंगना म्हणाली होती. तेव्हा उर्मिलाला २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळालं होतं.