अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच 'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज झाला ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने पुन्हा एकदा दावा केला आहे की, बॉलिवूडमध्ये तिच्याविरोधात 'षडयंत्र' रचलं गेलं आहे. अनेक कास्टिंग डायरेक्टर, सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना कंगनाने खुलासा केला की, "इंडस्ट्रीतील लोक इतरांना माझ्यासोबत काम न करण्याच्या सूचना देत होते. अनेक कास्टिंग डायरेक्टर्स आणि डीओपींनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. अभिनेत्यांना माझ्यासोबत काम करू नये म्हणून कॉल केले जात होते. माझ्याविरुद्ध अनेक कट रचले गेले."
"मी स्वत: ला भाग्यवान समजते"
कंगना पुढे म्हणाली की, "आव्हानं असूनही, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि महिमा चौधरी यांसारख्या स्टार्ससोबत काम केल्यामुळे मी स्वत: ला भाग्यवान समजते. जेव्हा लोक कठीण काळात तुमच्यासोबत काम करणं निवडतात तेव्हा ती "सर्वोत्तम भावना" असते. इमर्जेन्सीचे सर्वच कलाकार माझ्याशी खूप आदराने आणि प्रेमाने वागले."
"मला अनेक आव्हानांना सामोर जावं लागलं"
याआधीही कंगनाने इमर्जेन्सीच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान आपल्या विरोधात कट रचल्याबद्दल सांगितलं होतं. "हा चित्रपट तयार करताना मला अनेक आव्हानांना सामोर जावं लागलं आहे आणि मग त्या अडथळ्यांमधून साथ देणारे अनेक देवदूत भेटले आहेत. मला माझ्या कलाकारांचे विशेष आभार मानायचे आहेत.”
"फिल्म इंडस्ट्रीने मला बायकॉट केलं"
"प्रत्येकाला माहीत आहे की, फिल्म इंडस्ट्रीने मला बायकॉट केलं आहे. माझ्यासोबत उभं राहणं सोपं नाही, माझ्या चित्रपटाचा भाग बनणं सोपं नाही आणि माझी प्रशंसा करणं तर नक्कीच सोपं नाही. पण, त्यांनी (इमर्जन्सी कास्ट) हे सर्व केलं" असं कंगनाने म्हटलं आहे. लवकरच तिचा इमर्जेन्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.