ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने मशिदींमधून दिल्या जाणा-या अजानवर आक्षेपार्ह टि्वट केल्याने वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियामध्ये या वादावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी या वादामध्ये उडी घेऊन आपली मते व्यक्त केली. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनेदेखील अजानवर आपले मत नोंदवले आहे.
मी कोणाच्यावतीने बोलणार नाही पण अजान मला आवडते. मी लखनऊमध्ये शूटिंग करत असताना मशिदीमधून दिल्या जाणा-या अजानचा आवाज मला आवडायचा. गुरुव्दारा, मंदिर किंवा मशिदीमध्ये होणारे धार्मिक कार्य मला आवडते. मी या सर्व ठिकाणी गेली आहे. आपण ख्रिश्चनांच्या प्रार्थनेलाही जातो असे कंगनाने म्हटले आहे.
अजानबद्दल माझे हे व्यक्तीगत मत आहे पण म्हणून सोनू निगम जे म्हणतोय ते चुकीचे आहे, त्याचा विचार करु नये असे मी म्हणणार नाही. त्याचे ते व्यक्तीगत मत आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. यावर चर्चा झाली पाहिजे असे कंगनाने सांगितले.
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले.
या टि्वटनंतर मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला होता. सोनू निगमचं मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे सोनू निगमने आपला मुस्लिम मित्र हकिम आलीम याच्याकडूनच आपले केस कापून घेत सय्यद शाह आतेफ अली कादरी यांना जशास तसं उत्तर दिलं.