बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) आता खासदार झाली आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत मंडी येथून भाजपाच्या तिकीटावर तिने दणदणीत विजय मिळवला. कंगना रणौतने आधी बॉलिवूड गाजवलं आणि आता ती राजकारण करायला सज्ज झाली आहे. पण कंगनाला तिचा पहिला सिनेमा 'गँगस्टर'च्या रिलीजनंतरच राजकारणाची पहिल्यांदा ऑफर आली होती. तसंच राजकारणातील आयुष्यापेक्षा सिनेमा करणं सोपं आहे असं ती म्हणाली.
'द हिमाचल' पॉडकास्टमध्ये कंगना रणौत म्हणाली, "राजकारणात येण्याची ही काही मला आलेली पहिली ऑफर नव्हती. याआधीही अनेकदा मला ऑफर मिळाल्या होत्या. माझा गँगस्टर सिनेमा रिलीज झाला. माझे पणजोबा तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा कुटुंबातून येता आणि एखाद्या क्षेत्रात फेमस होता तेव्हा स्थानिक नेते तुमच्याशी संपर्क करतात. हे खूपच सामान्य आहे. माझ्या वडिलांनाही ऑफर आली होती. माझ्या बहिणीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर त्यातून सावरल्यानंतर तिलाही राजकारणात येण्याबद्दल विचारलं गेलं होतं. त्यामुळे आमच्यासाठी राजकारणाची ऑफर येणं ही काही फार मोठी गोष्ट नाही."
ती पुढे म्हणाली, "मला 2019 मध्येही अप्रोच केलं गेलं होतं. जर मला यात रस नसता तर मला इतक्या अडचणींमधून जावं लागलं नसतं. मी राजकारणाकडे फक्त एक ब्रेक म्हणून पाहत नाही. राजकारण खूप कठीण आहे आणि मी यासाठी तयार आहे. जर देवाने मला ही संधी दिली आहे तर मी प्रामाणिकपणे ती पार पाडेन. माझ्याहून जास्त मंडीच्या जनतेला हे हवं आहे की कोणीतरी असा त्यांना भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवेल. मी त्यांना निराश करु शकत नाही."
राजकारणाच्या तुलनेत सिनेमात काम करणं सोपं आहे. राजकारणातील आयुष्य हे डॉक्टरांसारखंच कठीण आहे जिथे केवळ अडचणीत असलेले लोक तुम्हाला भेटायला येतात. जेव्हा तुम्ही सिनेमा बघायला जाता तेव्हा तुम्ही खूप रिलॅक्स असता. पण राजकारण असं नाही."