मुंबई - टेस्लाचे सीईओ एलोन मस्क(Elon Musk) हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. ते कंपनीत येताच त्यांनी सर्वात आधी पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मस्क यांचे अभिनंदन केले. कंगनाचे चाहते एलोनला अभिनेत्रीचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्याची विनंती करत आहेत. या सगळ्यामध्ये कंगनाने तिच्या भविष्यवाणीबाबत आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, जी पराग यांच्याशी संबंधित आहे.
कंगनाचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. आता नवीन मालकाच्या आगमनानंतर, कंगना पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत येईल अशी अपेक्षा आहे. कंगना राणौतच्या ट्विटर अकाऊंटबाबत चाहत्यांनी अनेक ट्विट शेअर केले आहेत, जे खूप मजेदार आहेत. याशिवाय, इन्स्टा स्टेटसवर तिच्या भविष्यवाणीचं कौतुक करताना कंगनानं लिहिलंय की, 'मी नेहमी त्या गोष्टींचा अंदाज लावते, ज्या लवकरच होणार आहेत. काही लोक माझ्या दूरदृष्टीला एक्स रे म्हणतात, काही जण याला शाप म्हणतात. काहीजण जादूटोणा म्हणतात. किती दिवस आपण अशा स्त्री प्रतिभेला नाकारत राहणार? भविष्याचा अंदाज बांधणे सोपे नाही. यासाठी मानवी प्रवृत्तीची उल्लेखनीय ओळख आणि निरीक्षण कौशल्य देखील आवश्यक आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला आपल्या आवडी-निवडीचा त्याग करावा लागेल, जेणेकरून आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास करता येईल असं ती म्हणाली.
कंगना रणौतच्या इन्स्टा स्टेटसवर चाहत्यांचे काही ट्विटही शेअर केले आहेत. तिने एक ट्विट शेअर केलं आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की, 'हॅलो एलोन मस्क, कृपया कंगना रणौतचे अकाऊंट पुन्हा सुरू करा. ते ट्विटरच्या डाव्या विचारसरणीच्या कर्मचार्यांनी बंद केले आहे. धन्यवाद.' हे शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'हाहा मिसिंग ट्विटर फ्रेंड्स.' तिने काही मजेदार मीम्सही शेअर केल्या आहेत.कंगना राणौतसोबत भिडणाऱ्या अनेक दिग्गजांची अवस्था अत्यंत वाईट झाली हा देखील एक रंजक योगायोग आहे. यामध्ये केवळ पराग अग्रवालच नाही तर संजय राऊतांपासून उद्धव ठाकरेंपर्यंतचा समावेश आहे. जेव्हा राऊतांचा कंगनाशी सामना झाला त्यानंतर आता ते तुरुंगात आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंचे सरकार पडले. आता पराग अग्रवाल यांनाही नोकरी गमवावी लागली. हा निव्वळ योगायोग असला तरी चाहत्यांना ते खूपच गमंतीशीर वाटत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"