Lakshadweep vs Maldives: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यालक्षद्वीप ट्रिपने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्यांचे लक्षद्वीपचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मालदीव आणि तेथील राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. सोशल मीडियावर मालदीव विरुद्ध लक्षद्वीप अशी लाटच आली. दिग्गज लोकांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच लक्षद्वीपला पाठिंबा देत बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरु केला. यानंतर मालदीव बॅकफुटला आलं आणि त्यांनी त्यांच्या संबंधित लोकांवर कारवाई केली. या वादात कंगना रणौतने (Kangana Ranaut) मात्र सोशल मीडिया युझर्सला एक जाणीव करुन दिली आहे.
ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली,"आपले पंतप्रधान लक्षद्वीपचं पर्यटन वाढवण्यावर भर देत आहेत आणि यानंतर लोक ज्याप्रकारे ट्वीट्स करत आहेत ते चुकीचं आहे. सर्वात आधी तर त्यांनी फक्त आपल्या देशाचा प्रचार केला आहे फक्त लक्षद्वीपचा नाही. ते प्रत्येकाला सांगत आहेत की तुम्ही भारतातच लग्न करा. यामागे त्यांचं आत्मनिर्भर भारत बनवण्याचंच उद्दिष्ट्य आहे. मालदीववर कमेंट केल्याने तेथील पर्यटन कमी होईल हा केवळ भ्रम आहे."
ती पुढे म्हणाली,"जर लोक काश्मीरला जात असतील तर याचा अर्थ हा नाही की मनालीतील पर्यटन कमी होईल. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पर्यटनासाठी चालना देत आहात. यामुळे दुसऱ्या जागेचं पर्यटन कमी होत नाहीए. या इन्स्टाग्राम युगात लोकांना प्रत्येक ठिकाणी जायचं आहे. पंतप्रधान फक्त लक्षद्वीपला प्रोत्साहन देत आहेत आणि भारतात पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लोकांना मालदीवला नावं ठेवण्याचं लायसन्स मिळत नाही."
भारत खूप सुंदर देश आहे. फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी नाही तर लग्न आणि स्वदेशी कपडे, दागिने यादृष्टीनेही चांगला आहे. मी सुद्धा या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात काहीच नुकसान नाही. तसंच मालदीव सरकारने त्यांच्या तीन मंत्र्यांवर कारवाई केली ही चांगलीच गोष्ट आहे असंही ती म्हणाली.