भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईतील पाली हिल येथील तिचा बंगला नुकताच विकला आहे. यातून तिला कोटींची कमाई झाली आहे. नर्गिस दत्त रोडवर हा बंगला होता. २०१७ साली कंगनाने हा बंगला खरेदी केला होता. आता बक्कळ नफ्यासह तिने बंगला विकला आहे. कंगना सध्या 'इमर्जन्सी' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने अद्याप सर्टिफिकेट न दिल्याने ती सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.
कंगना रणौतचं मुंबई कनेक्शन तिच्या करिअरच्या काळापासूनच आहे. लॉकडाऊन काळात महापालिकेने तिच्या बांद्रा येथील ऑफिसवर हतोडा मारला होता. कंगनाचा बांद्रा येथीलच बंगला ३०७५ स्क्वेअप फुट एरियामध्ये पसरला आहे. ५ सप्टेंबर रोजी तिने बंगला विकला. यासाठी १.९२ कोटी स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले गेले. कोईम्बतूरच्या श्वेता बथीजा यांनी हा बंगला खरेदी केला आहे. कंगनाने तब्बल ३२ कोटी रुपयांना बंगला विकला आहे. म्हणजेच तिला यातून १२ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
कंगना रणौत भाजपाची मंडी येथील खासदार आहे. लोकसभा निवडणूकीवेळी तिने आपली संपत्ती एकूण ९१ कोटी असल्याचं दाखवलं होतं. सध्या कंगना सिनेमा आणि राजकारणातही व्यस्त आहे. तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.