नेहमी बोल्ड आणि बिंधास्त वक्तव्य करणारी 'धाकड गर्ल' अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशातील थिएटर्सबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसंच चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघणं आजकाल किती महाग झालं आहे याबद्दलही तिने भाष्य केलं आहे. एका नेटकऱ्याचं ट्वीट रिट्वीट करत तिने देशातील थिएटर्सवर आपलं म्हणणं मांडलं आहे.
गिरीश जोहर या ट्वीटर वापरकर्त्याने लिहिले,"बॉक्सऑफिस कोणालाच सोडत नाही. आयनॉक्स पीव्हीआरने 333 कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली आहे. त्यामुळे आता त्यांनी पुढील सहा महिन्यात न चालणारे ५० थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय."
या ट्वीटवर कंगनाने लिहिले, "देशात आणखी थिएटर्सची गरज आहे. आपल्याला आणखी स्क्रीन्सची गरज आहे. फिल्मइंडस्ट्रीसाठी हे वाईट आहे. मी आधीच म्हणलं होतं मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा बघणं आता महाग झालं आहे. मित्रपरिवारासोबत सिनेमा बघायला जाणं म्हणजे मध्यमवर्गीय माणसाच्या खिशाला कात्री आहे. काहीतरी केलं पाहिजे..."
कंगना लवकरच 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहेच. याशिवाय सिनेमात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मनिषा कोईराला यांच्याही मुख्य भूमिका आहेत.