बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता हा नेहमीच त्यांच्या बेधडक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. फेमिनिझम हा मूळातच फालतू विषय असून जोवर पुरुष गरोदर राहू शकत नाहीत. तोवर स्त्री पुरुष समानता म्हणता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. नीना यांनी केलेल्या या वक्तव्यांवर आता बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणाली, 'नीना जी बोलल्या त्यावर इतकी तीव्र प्रतिक्रिया का येत आहेत, हे मला समजत नाही. स्त्री आणि पुरुष हे कधीही समान असूच शकत नाहीत. ते एकमेकांपासून वेगळे आहेत. खरचं ते समान आहेत का? खरे तर आपल्यापैकी कोणीही समान नाही. प्रत्येकजण हा विकासाच्या वेगळ्या टप्यात आहे. आपल्याकडे देव, गुरु, वरिष्ठ, पालक किंवा अगदी बॉसदेखील आहेत. काहींना अधिक अनुभव आहे किंवा काही प्रत्यक्षात अधिक विकसित झाले आहेत, पण आपण कोणत्याही पातळीवर समान नाही'.
कंगना पुढे लिहिते की, 'आम्हाला पुरुषाची गरज आहे का? अर्थातच आहे. जशी पुरुषाला स्त्रीची गरज असते. माझ्या आईचे आयुष्य अडचणींनी भरले असते, जर तिला एकटेच आयुष्य जगावे लागले असते. त्याचप्रमाणे माझे वडील देखील माझ्या आईशिवाय त्यांचे जीवन जगू शकत नाहीत. यात कसली लाज आहे, हे समजत नाही. पुरुषांसाठी हे खुपच चांगले आहे का? हे सर्वांना माहित आहे की ते महिन्याचे सातही दिवस रक्तस्त्राव करत नाहीत. आणि त्यांच्यात दैवी स्त्री शक्तीचा प्रवाह वाहत नाही. स्वतःच्या घरात, बाहेर फिरताना महिलांपेक्षा मुलं अधिक सुरक्षित आहेत. मुलींसाठी, विशेषतः तरुण मुलींसाठी हे सोपे नाही'.
रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या होत्या, 'फेमिनिझम, स्त्री पुरुष समानता यावर चर्चा करणं किंवा यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही. मला वाटतं स्त्रियांनी आर्थिक दृष्टीने स्वतंत्र राहिलं पाहिजे. आपल्या कामावर लक्ष द्या. जर तुम्ही गृहिणी आहात तर स्वत:ला छोटं नका समजू. स्त्री पुरुष समान होऊच शकत नाही. जोवर पुरुष गरोदर होत नाहीत दोघांमधलं अंतर कायम राहणार'. नीना गुप्तांनी केलेल्या अशा अनेक विधानांवर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.