नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी एक बाजू समोर आली आहे. यानिमित्ताने मोदींनी गरबो नावाचं गुजराती गाणं रिलीज केलं आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: हे गाणं लिहिलं आहे. गरबो गाण्याच्या निमित्ताने मोदींमधील गीतकाराची बाजू सगळ्यांसमोर आली आहे. मोदींच्या या गाण्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मोदींचं हे गाणं ऐकून बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतही भारावून गेली आहे.
कंगनाने मोदींचं हे गरबो साँग ऐकल्यानंतर ट्वीट करत त्यांचं कौतुक केलं आहे. "हे किती छान आहे. अटलजींच्या कविता असो अथवा नरेंद्र मोदींची गाणी आणि कथा...आपल्या हिरोंना अशा कला सादर करताना पाहणं, नेहमीच हृदयस्पर्शी असतं. हे सगळ्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे," असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शनिवारी पीएम मोदींनी 'गरबो' गाणे रिलीज केले होते. हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेले गाणे आहे. या गाण्याला गायिका ध्वनी भानुशालीने आवाज दिला आहे, तर तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले आहे. मोदींनी माडी नावाचं आणखी एक गाणं लिहिलं आहे. हे गाणं दिव्या कुमारने गायलं आहे. तर मीट ब्रदर्सने या गाण्याला संगीत दिलं आहे.
दरम्यान, कंगना लवकरच 'तेजस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ ऑक्टोबरला तिचा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर कंगनाचा 'इमर्जन्सी' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.