ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - अभिनेता हृतिक रोशन बरोबर कंगनाची जी कायदेशीर लढाई सुरु आहे त्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनने कंगनाचे समर्थन केले आहे. कंगनाने स्वत:साठी उभा रहाण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मला कंगनाचा आदर वाटतो असे विद्याने सांगितले.
कंगनाने एका पार्टीमध्ये पत्रकारांशी बोलताना हृतिकचा सिली एक्स असा उल्लेख केला आणि या संपूर्ण वादाला सुरुवात झाली. कोण योग्य किंवा अयोग्य हे ठरवणे माझा विषय नाही पण कंगनाने स्वत:साठी उभे रहायचे जे धाडस दाखवले त्याबद्दल मला तिचा आदर वाटतो.
स्त्री नेहमी तिचे कुटुंब, मुले, पालकांसाठी उभी रहाते पण स्वत:साठी ती फार कमी वेळा उभी रहाते. कंगना स्वत:साठी उभी राहिली आहे म्हणून मला तिचे कौतुक वाटते असे विद्याने सांगितले. आगामी "Te3n" चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्यावेळी विद्या बोलत होती.
ह्रतिक रोशन व कंगनामधली कायदेशीर लढाई
अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यामधील कायदेशीर लढाई प्रत्येक दिवशी नवं वळण घेत आहे. हृतिक रोशन आणि कंगना राणावत दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. एकीकडे हृतिक रोशन आपला कंगनाशी काहीच संबंध नसल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे कंगना ह्रतिक खोटं बोलत असल्याचा दावा करत आहे.
ह्रतिकचा सिली एक्स असा उल्लेख
कंगनाने हृतिकचा 'सिली एक्स' असा उल्लेख केल्यानंतर या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली होती. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनीच हा फोटो व्हायरल केल्याचीदेखील चर्चा आहे. कंगनाची बहिण रंगोलीने हृतिकला 25 मे 2014 ला मेल पाठवून बनावट मेल आयडीची संयुक्त तक्रार करण्याच आवाहन केलं असतानादेखील हृतिकने तक्रार का केली नाही ? असा सवाल रिझवान सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे.
ह्रतिकची बनावट ईमेलची तक्रार
हृतिक रोशनचे वकिल दिपेश मेहता यांनी चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत. साक्षीदार म्हणून कंगना राणावतची 30 एप्रिलला चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. दिपेश मेहता यांनी पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये 40 ईमेल्सची माहिती दिली आहे. हे मेल कंगना राणावतने हृतिक रोशनच्या ख-या ईमेल-आयडीवर पाठवले होते. 24 मे 2014 नंतर हे मेल पाठवण्यात आले आहेत. 24 मार्चला ह्रतिकने बनावट ईमेल आयडीची तक्रार केली होती.