Join us

अरे बापरे; कोरोना रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आलेल्या कनिका कपूरने 400 जणांसोबत केली होती पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:32 IST

कनिकाने भारतात परतल्यानंतर तीन पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले आहे.

ठळक मुद्देपार्टींमध्ये कनिका अनेक लोकांना भेटली होती. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत.

बेबी डॉल या गाण्यामुळे नावारूपाला आलेली गायिका कनिका कपूरने कोरोनाची टेस्ट केली असून तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तिनेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

कनिका नुकतीच लंडनहून परतली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत लखनऊ येथे राहात होती. तिने भारतात परतल्यानंतर तीन पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले आहे. या पार्टींमध्ये ती अनेक लोकांना भेटली होती. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. या पार्टीला लोकांसोबतच तिथे काम करणारी मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व खासदार अकबर अहमद डम्पी यांच्या पार्टीत देखील कनिका गेली होती. या पार्टीत भाजपमधील अनेक नेते उपस्थित होते. या पार्टीत ४०० हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती. यामुळे कनिकाला भेटलेल्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कनिकाच्या घरात सहा जण असून त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे. 

कनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे. 

 

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या