Kantara Actor Rishab Shetty : गेल्या काही काळात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे आलेत आणि आले तसे आपटलेत. पण याचदरम्यान काही अतिशय कमी बजेटच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ‘कांतारा’ हा असाच एक सिनेमा. मूळ कन्नड भाषेत तयार झालेल्या आणि नंतर हिंदी व अन्य भाषेत डब करण्यात आलेल्या य सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला. 16 कोटी खर्चून बनलेल्या या सिनेमाने वर्ल्डवाईड 400 कोटींचा गल्ला जमवला. भारतात या सिनेमाने 300 कोटींचा बिझनेस केला. साहजिकच ‘कांतारा’च सर्वस्तरातून कौतुक होतेय. ‘कांतारा’ दिग्दर्शित करणारा आणि यात मुख्य भूमिका साकारणारा रिषभ शेट्टी (Rishab Shetty) याचीही जोरदार चर्चा आहे. याच रिषभ शेट्टीने सिनेमाच्या कमाईबद्दल एक मोठ भाष्य केलं आहे.
‘आजतक’च्या व्यासपीठावर रिषभ शेट्टी वेगवेगळ्या मुद्यावर बोलला. देशाची संस्कृती, साऊथ सिनेमा व बॉलिवूडची तुलना अशा मुद्यांवर त्याने मत मांडलं.
जशी कथा, तसा हवा बजेट...‘कांतारा’नंतर मोठ्या बजेटचे पॅन इंडिया सिनेमे बनवणार का? असा प्रश्न रिषभ शेट्टीला यावेळी विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘कांतारा’ हा सिनेमा मी कन्नड प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून बनवला होता. कन्नड चित्रपटांच्या हिशेबाने याचा बजेट फार कमी होता, असं म्हणून शकत नाही. बजेट ठीकठीक होता. पण नंतर निर्मात्यांनी हा सिनेमा हिंदी व अन्य भाषांमध्ये रिलीज करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा इतक्या कमी बजेटमध्ये आपला पॅन इंडिया सिनेमा रिलीज होतोय, असं मला वाटलं. माझ्या मते, जशी कथा, तसा बजेट असायला हवा.क्लोजअप शॉट हवा असताना मी हेलिकॉप्टरमधून थोडीच तो घेणार?
‘मी हिरो बनण्यासाठीच फिल्मी दुनियेत आलो होतो. पण अनेक प्रयत्न करूनही मला संधी मिळाली नाही. यानंतर मी असिस्टंट डायरेक्टर व अन्य विभागांत काम करू लागलो. दिग्दर्शनातील बारकावे समजल्यावर मला यात मजा वाटू लागली. हे सगळं शिकून मी गाव अणि संस्कृतीच्या कथा लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. नंतर मात्र मला दिग्दर्शनासोबत अॅक्टिंगचीही संधी मिळाली,’ असंही रिषभने सांगितलं.