प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) सध्या एका वादात सापडला आहे. होय, मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात या शोविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. शोच्या एका एपिसोडमधील दृश्यावर आक्षेप नोंदवत एका वकीलाने थेट कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर येत्या 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काय आहे प्रकरणशिवपुरीच्या एका वकीलाने ‘द कपिल शर्मा शो’विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. सोनी टीव्हीवर प्रसारित होणा-या ‘द कपिल शर्मा शो’च्या 19 जानेवारी 2020 रोजी प्रसारित एपिसोडमध्ये कोर्टरूमच्या सीनमध्ये कलाकारांना दारू पिताना दाखवले आहे. हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचा दावा, याचिकाकत्याने केला आहे. हा एपिसोड अलीकडे 24 एप्रिल 2021 रोजी रिटेलिकास्ट करण्यात आला होता. कलाकार मद्यधुंद अवस्थेत कोर्टरूमच्या सेटवर अभिनय करताना दाखवणे हे चूक असून न्यायदेवतेचा अपमान आहे. शोमध्ये महिलांवर अश्लिल कमेंट केल्या जातात. कोर्टरूमचा सेट उभारून अपमानास्पद विनोद केले जातात. हे सर्व गैर असून यामुळे आपण कोर्टात कलम 356/3 अंतर्गत दोषींवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केले आहे. विनोदाच्या नावावर असला विभत्स प्रकार थांबला पाहिजे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्माशिवाय भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, किकू शारदा, अर्चना सिंग असे कलाकार पे्रक्षकांचे मनोरजंन करताना दिसतात. गेल्या 21 आॅगस्टपासून या शोचा नवा सीझन सुरू झाला आहे.