मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याला सोनी वाहिनीने मोठा झटका दिला आहे. या चॅनेलवरील 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' हा कार्यक्रम बंद होणार आहे. या कार्यक्रमाचे फक्त 3 भाग प्रसारित झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्माच्या अव्यवसायिक वर्तनामुळे सोनी टेलिव्हिजनने हा निर्णय घेतला.कपिलने काही पत्रकारांना फोनवरून शिवीगाळ केली होती व धमकावल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. गेल्या काही महिन्यांतील घटनांमुळे कपिल शर्मा वैफल्यग्रस्त झाला आहे. मध्यंतरी याच भरात त्याने आक्षेपार्ह भाषा असलेली ट्विटस केली होती. या सगळ्यामुळेच सोनी चॅनेलने कपिल शर्माचा शो बंद करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
'द कपिल शर्मा शो'चा सोनी वाहिनीसोबत असणारा करार या महिन्यात संपुष्टात आला होता. पण सोनी वाहिनीने या कार्यक्रमासोबत आणखी एक वर्षांचा करार केला होता. परंतु त्यानंतर स्वत: कपिल शर्मा अन्य पर्यायांच्या शोधात होता. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्मा ऑनलाइन स्ट्रिमिंग चॅनल नेटफ्लिक्सवर कॉमेडी करणार आहे. Netflix India सोबत कपिल शर्माची बोलणी सुरू आहेत. कपिल शर्मा डिजिटल प्लेटफॉर्मवर आपला शो आणण्यासाठी उत्साहित आहे. कपिलच्या मते भविष्यात सर्व मनोरंजन डिजिटलवर होणार आहे. कपिल नेटफ्लिक्ससह अमेझॉन आणि हॉटस्टारच्या टीमसोबतही संपर्कात आहे. फक्त एका पर्यायावर अवलंबून न राहता अनेक पर्याय उपलब्ध ठेवण कधीही चांगल असे कपिलला वाटत आहे.