The Kapil Sharma Show to go Off-air : ‘द कपिल शर्मा शो’च्या ( The Kapil Sharma Show) चाहत्यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. होय, दर शनिवार-रविवारी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा शो लवकरच बंद होणार असल्याचं कळतंय.
‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनवरून निर्माण झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट कपिल शर्मा’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘द कपिल शर्मा शो’ बंद होतोय, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही नाहीये. मुळात कारण वेगळंच आहे. अद्याप कपिल शर्माने (Kapil Sharma) शो बंद होणार असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार,‘द कपिल शर्मा शो’ लवकरच ऑफ एअर होणार आहे आणि हा निर्णय स्वत: कपिल शर्माचा आहे.
‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल येत्या 11 जून ते 3 जुलैपर्यंत युएस-कॅनडा टूरवर आहे. याकाळात कपिलसोबत त्याची अख्खी टीम या टूरमध्ये बिझी असणार आहे. याशिवाय आणखी काही प्रोफेशनल कमिटमेंट्स त्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे कपिलने एक छोटासा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मधून काही महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा नव्या सीझनसह परतण्याचा त्याचा इरादा आहे.
अलीकडे सोशल मीडियावर ‘बॉयकॉट कपिल शर्मा’ हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड झाला होता. या हॅशटॅगचा वापर करत नेटकऱ्यांनी कपिल शर्माच्या शोवर बंदी घालण्याची मागणी केली होती. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू झाला होता. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये मोठमोठे स्टार्स नसल्याने कपिल शर्माने आम्हाला त्यांच्या शोमध्ये बोलावलं नाही, अशा आशयाचं ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी कपिलला ट्रोल केलं होतं.