Join us

कपिल शर्माची पुन्हा शिवीगाळ, वेबसाइट एडिटरविरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 8:25 AM

कपिलने थेट प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे.

मुंबई- कपिल शर्मा व त्याच्या वक्तव्यावरून किंवा वागण्यावरून निर्माण होणारे वाद हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाहीत. काहीना काही कारणाने कपिल शर्मा नेहमीच चर्चेत असतो. आता कपिल शर्माने आणखी एक नवा वाद ओढावून घेतला आहे. यावेळी त्याने सहकलाकार किंवा इतर कुणाला टार्गेट न करता थेट प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. इतकंच नाही, तर कपिलने प्रसारमाध्यमांना शिवीगाळ केली आहे. ट्विटर अकाऊंटवरून कपिलने प्रसारमाध्यमांना आणि सरकारी यंत्रणेला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली आहे. कपिलने या ट्विटमध्ये काळवीट प्रकरणात सलमान खानची बाजू घेत तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

कपिलने शुक्रवारी (मार्च 6) संध्याकाळी एकामागे एक असे चार ट्विट केले. या चारही ट्विटमध्ये भारतातली प्रसारमाध्यमं आणि सरकारी यंत्रणा किती निष्फळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. असभ्य भाषेत कपिलने ही ट्विट केले.

 ‘स्वतःच्या वृत्तपत्राचा खप वाढविण्यासाठी चांगल्या माणसाविरोधात नकारात्मक बातम्या छापू नका. तो एक चांगला माणूस आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच बाहेर येईल. खोटी बातमी छापण्यासाठी तुम्ही किती पैसे घेता? आताची पत्रकारिता ही विकलेली आहे.’ असं ट्विट कपिल शर्माने केलं यावेळी त्याने ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटला अश्लिल शिवीगाळही केली.

 ‘मी असे अनेक स्वतःला महाराज समजणारे लोक पाहिले आहेत जे स्वतः त्यांनी वाघाची शिकार केली ते मान्य करतात. मी अशा लोकांना भेटलो आहे. सलमान अनेकांची मदत करतो. तो खूप चांगला माणूस आहे. मला माहित नाही त्याने हे केले की नाही. पण माणसाची चांगली बाजूही पाहा. ही यंत्रणा फार वाईट आहे. मला माझं चांगलं काम करु द्या.’असं ट्विटही कपिलने केलं.  ‘बातम्यांमध्ये नेहमीच सूत्रांचा अहवालानूसाल असा शब्द वापरला जातो. पण तुमचे सूत्र कोण आहेत ते तरी एकदा सांगा…’ ‘मी जर पंतप्रधान असतो तर खोट्या बातम्या छापणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली असती.’ असे ट्विट त्याने केलं. ट्विट केल्यानंतर अर्ध्या तासातच कपिलने हे ट्विट डिलीट केले. पण त्याआधीच कपिलचे हे ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

दरम्यान, या वादग्रस्त ट्विटनंतर कपिल शर्माने 'स्पॉटबॉय'चे एडिटर विकी लालवानी, कथित एक्स-गर्लफ्रेण्ड प्रीती सिमोई आणि तिची बहिण नीती सिमोई विरोधात तक्रार दाखल केली आहे. नीती व प्रीती याआधी कपिलच्या मॅनेजर म्हणून काम करत होत्या. विकी लालवानी माझ्याकडून 25 लाख रूपये उकळण्याचा प्रयत्न करत होता. मी ते देण्यास नकार दिल्याने त्याने डिजीटल मीडियावर माझ्याबाबतील खोट्या बातम्या पसरवू लागला, असा आरोप कपील शर्माने केला आहे. 

कपिल शर्माने पोलीस तक्रारीची कॉपी ट्विटरवर पोस्ट केली आहे. 'काही लोक फक्त पैशांसाठी तुमची बदनामी करतात. पण चुकी विरोधात उभं राहायला वेळ लागतो. आज मी ते केलं आहे व नेहमी करीन', असं कॅप्शन कपिलने ट्विट करताना दिलं आहे. 

 

टॅग्स :कपिल शर्मा सोशल मीडिया