मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा एका वादामुळे चर्चेत आला आहे. कपिल शर्माने त्याची कथित एक्स गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोन विरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कपिलने प्रितीवर त्याच्या कंपनीत हेरफेर केल्याचा आरोप केलाय. प्रिती सिमोस ही 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोची क्रिएटिव्ह डायरेक्टर होती.
कपिलने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'प्रितीच संपूर्ण शोची तयारी करायची. शोमध्ये काय होणार हे सगळं ती ठरवायची. प्रितीची जबाबदारी पाहून मी तिला 2 लाख रुपये पगार दिला होता. त्यानंतर तिची बहिण नीतिला सुद्धा मी काम दिले. दोघी सोबत काम करायच्या. त्यांना प्रोफेशनल लाईफसोबतच मी पर्सनल लाईफबाबतही सगळं काही सांगितलं होतं'.
कपिलने पुढे म्हणाला की, 'माझ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये मी 2013 मध्ये अनुश्री नावाच्या एका मुलीला नोकरी दिली होती. पण प्रिती आणि नीतिच्या सांगण्यावरुन मी अनुश्रीला 2016 मध्ये कामावरुन काढले. दोघींनी मला सांगितले होते की, अनुश्री शोमध्ये येणा-या लोकांकडून पैसे घेऊन घोटाळा करत आहे. पण एकदा माझी भेट अनुश्रीसोबत झाली आणि तिने मला सांगितले की, प्रिती आणि नीति दोघीही प्रेक्षक म्हणून येणा-यांकडून पैसे घेत होत्या'.
प्रितीवर आरोप लावत कपिल म्हणाला की, 'दोघी बहीणींनी माझ्यात आणि माझ्या सहयोगी कलाकारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. हेच नाहीतर शोमध्ये येणा-या सेलिब्रिटींचं कोआर्डिनेशन करणं तिचं काम होतं. पण मला कधीच वेळेवर माहिती मिळत नव्हती. त्यामुळे काही कलाकारांमध्ये बरेच गैरसमज निर्माण झाले. याच कारणाने अनेक कलाकारांसोबत माझे संबंध बिघडले. माझी बदनामी सुरु झाली आणि माझ्या कामाचं नुकसान होऊ लागलं'.
'प्रिती आणि नीति माझ्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या आणि यासाठी त्यांनी अनुश्रीचाही वापर केला. या सगळ्या गोष्टी मला अनुश्रीने सांगितल्या. 2016 मध्ये मी प्रिती आणि नीतिला कामात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. जेव्हा त्यांना त्यांचे कारनामे पकडले जाण्याची भीती वाटली तेव्हा त्या कंपनी सोडून गेल्या. त्यानंतर पुन्हा दोन्ही बहिणी जुन्या गोष्टी विसरुन पुन्हा नव्याने काम करण्याचं बोलल्या. त्यानुसार कामही सुरु झालं. पण 3 महिन्यांनी पुन्हा वाद झाला आणि मार्च 2017 मध्ये पुन्हा दोघी बाहेर पडल्या'.
'फेब्रुवारी 2018 मध्ये मी प्रितीची तिच्या घरी भेट घेतली. खरंतर एका वेबसाईटला ती माझ्याबाबत लागोपाठ नकारात्मक बातम्या देत होती. त्यामुळे हा विषय इथेच संपवण्याची मी तिला विनंती केली. पण तिने मला उत्तर दिले की, 'माझ्याशिवाय तू इंडस्ट्रीत काम करु शकत नाही. मी तूला सोडणार नाही. मी तूला इंडस्ट्रीतून संपवणार आणि जर तूला या सगळ्यातून सुटका मिळवायची असेल तर आम्हाला 25 लाख रुपये दे'. यावर मी कशासाठी 25 लाख रुपये असे विचारल्यावर ती म्हणाली की, मला पुढेही द्यायचे आहेत. मी नकार देत तिच्या घरातून निघून गेलो.
कपिलने दिलेल्या तक्रारीत त्याने प्रिती, नीती आणि वेबसाईटता एडिटर विकी लालवानी विरोधात पैसे मागितल्याचा उल्लेख केला आहे.