बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी अभिनेत्याला धर्मा प्रॉडक्शनकडून एक खास भेट मिळाली आहे. धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक आर्यनच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्यासोबत एका नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे.
धर्मा प्रॉडक्शन हाऊसने पोस्टमध्ये म्हटले की, 'कार्तिक आर्यन स्टारर आणि संदीप मोदी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता, शोभा कपूर, एकता आर कपूर यांनी केली आहे'.
कार्तिक आर्यननेही या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, 'शौर्य आणि बलिदानाने भरलेल्या आपल्या गौरवशाली भारतीय इतिहासाचा एक अविस्मरणीय अध्याय आता माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. हा विषय माझ्या हृदयाच्या जवळ आहे. संदीप, करण जोहर आणि एकता नवीन प्रवास सुरू करताना मला खूप आनंद आहे'.
कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील वाद कोणापासून लपून राहिला नव्हता. दोघांमध्ये दोस्ताना 2 या चित्रपटामुळे वाद झाला होता. इतकेच नाहीतर कार्तिक आर्यन आणि करण जोहर हे एकमेकांकडे बघणे देखील टाळताना दिसले. मात्र, आता अखेर दोघांमधील वाद दूर झाला आहे.
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकतेच कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. कार्तिक आर्यनकडे सध्या अनेक प्रोजेक्ट हातामध्ये आहेत. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. या चित्रपटासाठी कार्तिक जोरदार तयारी करत आहे.