करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. गत शनिवारी करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. या लेट नाईट पार्टीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण या पार्टीत दिसले. करणने या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले. व्हिडीओत सर्व स्टार्स ज्या स्थितीत दिसत आहेत, त्यावरून ते सगळे नशेत तर्र असल्याचे युजर्सने म्हणणे आहे.
अनेकांनी विकी कौशलचा फोटो शेअर करून विकी दारूच्या नशेत आहे की ड्रग्जच्या असा प्रश्न उपस्थित केला आहे. कॅमेरा समोर येताच विकी आपले नाक स्वच्छ करताना दिसतो, यावरून अनेकांनी तो ड्रग्जच्या नशेत असल्याचा दावा केला आहे.
मिलिंद देवरा यांनी केला खुलासा
आता राजकीय पक्षांनीदेखील या पार्टीचा मुद्दा उचलून धरला आहे. अकाली दलाचे नेते मजिंदर सिरसा यांनी करणच्या पार्टीतील व्हिडीओ शेअर करत, बॉलिवूड स्टार्सवर टीकास्त्र सोडले. ‘हे आहे फिक्शन वर्सेस रिअॅलिटी. पाहा बॉलिवूड कलाकार असे अभिमानाने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे दाखवत आहेत. अशाप्रकारे अमली पदार्थांचे सेवन करणा-या कलाकारांचा मी विरोध करतो. तुमचाही याला विरोध असेल,तर रिट्विट करा’,असे ट्विट मंजिदर सिरसा यांनी केले. मात्र सिरसा यांच्या या ट्विटवर काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी लगेच खुलासा केला. ‘माझी पत्नीदेखील त्या पार्टीमध्ये उपस्थित होती आणि या व्हिडीओमध्येदेखील ती दिसून येत आहे. या पार्टीमध्ये कोणत्याही कलाकाराने अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते. त्यामुळे उगाच अफवा पसरवणे बंद करा. मी आशा करतो की याप्रकरणी तुम्ही माफी मागण्याचे धाडस कराल, असे उत्तर मिलिंद देवरा यांनी दिले.