दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवतोय. त्याच्या एक से एक सिनेमांनी प्रेक्षकांना त्याच्या सिनेमांच्या प्रेमात पडायला लावलंय. तो एक यशस्वी निर्माता, दिग्दर्शक तर आहेच पण आता तो दोन मुलांचा बाबाही आहे. 2017 साली तो सरोगसीच्या माध्यमातून यश आणि रुही या जुळ्या मुलांचा बाबा झाला. करणला नेहमीच ट्रोल्स आणि टीकेला सामोरं जावं लागलं आहे. पण माझ्या मुलांबद्दल मी काहीही वाईट वाचू शकत नाही असं त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
म्हणूनच करणने ट्विटर सोडलं
एका मुलाखतीत करण जोहर म्हणाला,'जेव्हा मी माझ्या मुलांबद्दल वाईट वाचत होतो तेव्हा मला ते सहन होत नव्हतं. मला शिव्या द्या, जे बोलायचं ते बोला. ट्रोलर्सने माझ्या आईसोबतही दुर्व्यवहार केला. माझी आई एक सिनिअर सिटीझन आहे. हे सगळं बघता मी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माझी मुलं पाच वर्षांची होती.'
तो पुढे म्हणाला,'मला ट्विटरचं महत्व माहित आहे. पण मला ते व्यासपीठ नकोय. मी माझ्या मुलांबद्दल काहीच वाईट वाचू शकत नाही.केवळ बाप म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही मला फार वाईट वाटायचं. असं अजिबातच नाही की मी इंडस्ट्रीतील लोकांना कास्ट करणं बंद केलं होतं. हा माझ्या मुलांचा प्रश्न होता. कोणताही माणूस स्वत:बद्दल काहीही ऐकू शकतो पण मुलांबद्दल एकही वाईट शब्द ऐकू शकत नाही.'
करण जोहरने ट्विटर सोडताच तो आता केवळ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अॅक्टिव्ह असतो. मध्यंतरी कंगना रणौतच्या आरोपांनंतर करण जोहरला लक्ष्य केलं गेलं. बॉलिवूडमध्ये नेपोटिझम पसरवण्यापासून ते बॉलिवूड माफिया असे अनेक आरोप त्याच्यावर लावले गेले. सोशल मीडियावर त्याच्या मुलांबद्दल, आईबद्दलही वाईट लिहिलं गेलं तेव्हा मात्र त्याने ट्विटरला रामराम ठोकला. करणचा नुकताच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज झाला. या सिनेमातून करण ७ वर्षांनी दिग्दर्शनात परतला. आलिया भट आणि रणवीर सिंहच्या या सिनेमाने तुफान कमाई केली.