बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या करण जोहरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. नुकतीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमाची सक्सेस पार्टी पार पडली. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटात रॉकी हा रानीच्या आईसाठी ब्रा खरेदी करतो, असा सीन दाखविण्यात आला आहे. या पार्टीत मीडियाबरोबर साधलेल्या संवादात करणने चित्रपटातील या सीनवर भाष्य केलं.
करण म्हणाला, “माझ्यासाठी हा कधीच निषिद्ध विषय नव्हता. मीदेखील माझ्या आईसाठी ब्रा खरेदी करण्यासाठी गेलो होतो. आणि मला यात कधीच प्रॉब्लेम वाटला नाही. तेव्हा माझ्याबरोबर काही मित्रही होते. मी हे काय करतोय, असं त्यांना वाटत होतं. या गोष्टीमुळे ते घाबरले होते. माझ्या मैत्रिणीकडून मी ही गोष्ट करुन घ्यावी, असं त्यांना वाटत होतं. पण मला ते पटत नव्हतं. माझ्या आईने मला स्वत: ही गोष्ट करायला सांगितली आहे, तर मी आणखी कोणाला याबाबत का सांगू?”
“माझी आई आता ८१ वर्षांची आहे. जेव्हा तिला काही गोष्टींची आवश्यकता असते. तेव्हा त्या वस्तू मी तिला खरेदी करुन आणून देतो. मग ती वस्तू अंतर्वस्त्र असू शकते किंवा आणखी काही...चित्रपटातील तो सीन पाहून काही लोक अस्वस्थ होतील, हे मला माहीत होतं. पण हाच विषय आहे. चित्रपटात रानीची आई रॉकीला म्हणते की अनेक वर्षांपासून महिला पुरुषांची अंर्तवस्त्रे हाताने स्वच्छ करत आल्या आहेत आणि तुम्ही एका ब्राला हात लावू शकत नाही,” असंही पुढे करण जोहर म्हणाला. करणने केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटात रणवीर आणि आलियासह शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत ७० कोटींची कमाई केली आहे.