फिल्म निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. २५ वर्षांपूर्वी आलेल्या 'कुछ कुछ होता है' सिनेमातून करणने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. तेव्हापासून शाहरुख आणि करणची जोडी हिट आहे. दोघंही एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाहीत. असं असतानाही करणने नुकत्याच रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात शाहरुखला कॅमिओची ऑफर दिली नाही. शाहरुखला आता कॅमिओ करायला सांगायची हिंमत होत नाही असं तो म्हणाला.
करण जोहरने नुकतीच 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला,"माझ्या संपूर्ण टीमची अशी इच्छा होती की 'तुम क्या मिले' गाण्यात रणवीर-आलियाला ट्रॅक आऊट करुन शाहरुख काजोलला दाखवण्यात यावं. त्यांनी शाहरुख-काजोलकडे बघावं आणि आलियाला प्रेमाची जाणीव व्हावी. ते दोघंही प्रेमाचे प्रतीक आहेत. पण शाहरुखला विचारण्याची हिंमत मी कशी करु? शाहरुखला केवळ एका गाण्यासाठी थेट काश्मीरला कसं बोलावू? शाहरुख मला कधीच नाही म्हणत नाही. त्यामुळेच मला त्याच्याशी बोलण्याआधी विचार करावा लागतो."
तो पुढे म्हणाला, "ब्रह्मास्त्रच्यावेळी शाहरुख पूर्ण टीमसोबत आला होता. भूमिकेबाबत ऐकल्यानंतर त्याने करणला नाही म्हणून शकत नाही अशी प्रतिक्रिाय दिली. मी या गोष्टीला हलक्यात घेऊ शकत नाही. ऐ दिल है मुश्किल वेळी मी विचार केला होती की एकतर्फी प्रेमाचे डायलॉग शाहरुखशिवाय आणखी कोणीच बोलू शकत नाही. म्हणूनच मी त्याला विचारलं. पण रॉकी और रानी वेळी पुन्हा त्याला विचारायची मला लाज वाटली. त्याने १४ दिवसात ब्रह्मस्त्रसाठी शूट केले होते. तसंच एक रुपयाही घेतला नव्हता. पूर्ण एनर्जीसह काम केले होते. तो दिल का बादशाह आहे."