चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून करण जौहरला ओळखलं जातं. नुकतंच करण जोहरने तो एका दुर्मिळ आजाराचा सामना करत असल्याचा खुलासा केला आहे. तब्बल गेल्या ४४ वर्षांपासून करण शारीरिक समस्यांचा सामना करत आहे. या आजारामुळेच करणला ओव्हरसाइज कपडे परिधान करावे लागतात. विशेष म्हणजे करण जोहरने या आजाराचा स्वीकार केला असून तो त्यासाठी स्वत: काळजी घेतोय.
करण जोहर हा 'बॉडी डिसमॉर्फिया' या आजाराने त्रस्त आहे. करणनं एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं, 'मला बॉडी डिस्मॉर्फिया आजार आहे. मला स्वीमिंग पूलमध्ये जाताना खूप अस्वस्थता जाणवतं. मी यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. माझं यश आणि स्वत:ची समज काही फरक पडत नाही. मी ओव्हरसाइज कपड्यांमागे लपतो. वजन कमी केलं आणि त्यावर मात करण्याचे प्रयत्न केलेत. तरीही मी अजून शरीराच्या प्रतिमेच्या समस्यांशी लढतोय. दिसण्याबद्दल सतत आत्म-जागरूक राहण्यापेक्षा मी माझं शरीर लोकांच्या नजरेतच येणार नाही, याची काळजी घेतो'.
इतकेच नाही तर करण जोहरने असेही सांगितले की, तो सध्या यासाठी थेरपी घेत आहेत. करणला असलेला 'बॉडी डिसमॉर्फिया' हा एक मानसिक विकार आहे. यात व्यक्तीला असे वाटते की त्याच्या शरीराच्या काही भागात समस्या आहेत. या आजारात आपण कसे दिसतोय, लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे, याचा विचार सतत डोक्यात असतो. या आजारात डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. हा विकार बालपणातच समुपदेशन किंवा थेरपीद्वारे दूर केला नाही तर तो तुमची साथ फार काळ सोडत नाही.
तज्ञांच्या मते, ही एक चित्रविचित्र मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वत:च्या शरीरात दोष शोधू लागते. या समस्येशी झुंजणाऱ्या लोकांचं शरीर कितीही चांगलं किंवा सुदृढ का असेना पण ही लोक नेहमी चांगल्या गोष्टीं ऐवजी स्वतःमध्ये उणीवाच शोधतात. या आजाराने ग्रस्त रुग्णांना त्यांच्या शरीर किंवा त्वचेत अनेक अस्वस्थ करणारे बदल दिसू लागतात. या आजाराने प्रभावित व्यक्तीला मानसिक समस्या असू शकतात. त्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.