कलंक या चित्रपटाची करण जोहरने घोषणा केल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट दमदार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे.
कलंक हा चित्रपट १९ एप्रिलला नव्हे तर १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यामागे एक खास गोष्ट आहे. १७ एप्रिलला महावीर जयंती असल्याने अनेकांना सुट्टी असणार आहे. तसेच १९ एप्रिलला देखील गुड फ्रायडेची सुट्टी आहे.
एकाच आठवड्यात असलेल्या या दोन सुट्ट्यांचा या चित्रपटाच्या कमाईला फायदा होईल असा विचार करूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे.
चित्रपट दोन दिवस आधी प्रदर्शित केल्यामुळे कलंक या चित्रपटाला आणखी एक फायदा होणार आहे. १७ एप्रिलनंतर थेट २६ एप्रिलला पुढचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी सलग नऊ दिवस मिळणार आहेत. २६ एप्रिलला अॅव्हेंजर्सः एन्ड गेम बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची धास्ती घेऊन देखील हा निर्णय घेतला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘कलंक’ चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाचा काळ ४० च्या दशकातील असून सगळ्याच व्यक्तिरेखा एका वेगळ्या रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. करण जोहरने ६ मार्चला 'कलंक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. हा लूक पाहून या सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.