मुंबई- निर्माता- दिग्दर्शक करण जोहर व त्याचे वडील यश जोहर यांनी 15 वर्षापूर्वी ठरविलेल्या सिनेमाची आज घोषणा करण्यात आली आहे. 'कलंक' असं सिनेमाचं नाव असून या सिनेमात बॉलिवडूमधील तगडी स्टारकास्ट असणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात आधी अभिनेत्री श्रीदेवी या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार होत्या. पण आता श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित या सिनेमात झळकणार आहे. माधुरीबरोबरच संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर हे कलाकारही या सिनेमात असतील. आज या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. कलंक सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता संजय दत्त तब्बल 21 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.
अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे. 'कलंक या सिनेमाची कल्पना 15 वर्षाआधी सुचली होती. या सिनेमाचं प्री-प्रोडक्शन माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं. आता हा सिनेमा अभिषेक वर्मनकडे देताना मला खूप आनंद होतो आहे, असं करण जोहरने ट्विट करत म्हटलं आहे. 'कलंक' या सिनेमाचं नाव शिद्दत असेल असं आधी बोलल जात होतं. पण करण जोहरनेच याबद्दलचं स्पष्टीकरण देत सिनेमाचं नाव शिद्दत नसल्याचं सांगितलं.
काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूरने माधुरी व श्रीदेवीचा फोटो शेअर करत माधुरी सिनेमात काम करणार असल्याच्या वृत्तावर आनंद व्यक्त केला होता. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर लगेचच #Kalank सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आहे. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट पोस्टर शेअर करत सिनेमाबद्दल उत्सुक असल्याचं सांगते आहे. 19 एप्रिल 2019 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.