बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. २०१६मध्ये बिपाशा आणि करणने लग्नगाठ बांधत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांच्या घरात चिमुकलीचं आगमन झालं. वयाच्या चाळीशीत बिपाशाने लेक देवी हिला जन्म दिला. पण, जन्मानंतर बिपाशाच्या लेकीच्या हृदयाला दोन छिद्र असल्याचं समजलं होतं. त्यानंतर तिच्या हृदयावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. याबाबत आता पहिल्यांदाच करण सिंग ग्रोव्हर व्यक्त झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हर त्याच्या 'फायटर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुकही होत आहे. पण, फायटरसाठी शूटिंग करणं करणसाठी सोपं नव्हतं. 'फायटर' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच त्याला लेकीच्या हृदयाला छिद्र असून सर्जरी करावी लागणार असल्याचं समजलं होतं. या कठीण काळाबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करणने भाष्य केलं. तो म्हणाला, "सुरुवातीला मला काम करावंसं वाटत नव्हतं. कारण, तेव्हाची परिस्थिती फार गंभीर होती आणि तेव्हा दूर राहणंही खूप कठीण होतं. मला ती परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता आली नाही. बिपाशामुळे त्या परिस्थितीचा सामना मी करू शकलो."
"या परिस्थितीतून जाण्यापेक्षा मृत्यू सोपा आहे, असं मला वाटत होतं. मला आठवतंय की जेव्हा देवीला सर्जरीसाठी डॉक्टर घेऊन जाणार होते. मला तिला त्यांच्याकडे द्यावंसं वाटतंच नव्हतं. पण, माझी पत्नी बिपाशा शेरनी आहे. ती एक खूप स्ट्राँग आहे. पण, जेव्हा ती आई झाली. तेव्हापासून मला ती देवासारखी भासू लागली," असंही पुढे करणने सांगितलं.
२०२२मध्ये बिपाशाने देवीला जन्म दिला होता. पण, मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचं समजताच बिपाशा आणि करणच्या पायाखालची जमीनच सरकली होती. एका मुलाखतीत बिपाशाने लेकीच्या सर्जरीबद्दल खुलासा केला होता. अनेकदा बिपाशा आणि करण लेकीबरोबरचे फोटो शेअर करत असतात.