सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. यात सध्या जुनी गाणी पुन्हा ट्रेंड होऊ लागली आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर करीना कपूरच्या 'अशोका' या सिनेमातील 'सन सनन' हे गाणं तुफान ट्रेंड होत आहे. अनेकांनी या गाण्यावर मेकअप ट्युटोरिअलचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर आता करीनाने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
करीनाने 'ग्राझिया इंडिया'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने २००१ सालचं तिचं गाणं सध्या ट्रेंड होण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल २३ वर्षानंतर हे गाणं ट्रेंड झाल्यामुळे ती प्रचंड भारावून गेली आहे.
"मला वाटतं हे खरंच खूप सरप्राइजिंग आहे. कारण, २०- २२ वर्षानंतर हे गाणं असं व्हायरल होतांना पाहून खूप छान वाटतंय. ज्यावेळी आम्ही हे गाणं शूट करत होतो त्यावेळी ते इतकं आयकॉनिक ठरेल असं वाटलं नव्हतं. अंगावरील टॅटू, डोळ्यांचा तो मेकअप सगळंच खूप छान होतं", असं करीना म्हणाली.
पुढे ती म्हणते," मी साकारलेली जी कौरवाकी ही भूमिका होती. ती, निडर, बिनधास्त अशा स्वभावाची होती. त्या अनुषंगाने माझा लूक सुद्धा वेगळा हवा होता. पण, मी खरंच त्यावेळी कोणताही मेकअप केला नव्हता. फक्त माझ्या डोळ्याभोवती काही डिझाइन्स केल्या होत्या. अगदी एक टक्का सुद्धा मेकअप मी केला नव्हता. त्यावेळी मी २२ वर्षांची होते आणि त्यावेळी संपूर्ण अंगावर टॅटू असणं हे त्यावेळी मला फार कूल वाटत होतं."
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अशोका ट्रेंड होत आहे. अनेक मेकअप आर्टिस्ट, ब्युटी इन्फ्लुएंसर्स या गाण्यावर मेकअप करतांनाच्या स्टेप्स दाखवत हा ट्रेंड फॉलो करत आहेत.