Join us

करिना कपूर, अमृता अरोरा कोरोनाबाधित; बॉलिवूडमधल्या जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीनं वागावं : महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 06:12 IST

Coronavirus : देशात व मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना या अभिनेत्रींना संसर्ग झाल्याने पुन्हा एकवार चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, 

मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त होत असतानाच करिना कपूर आणि अमृता अरोरा या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे देशात व मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना या अभिनेत्रींना संसर्ग झाल्याने पुन्हा एकवार चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत शहरात अनेक ठिकाणी पार्ट्यांना हजेरी लावल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघीही सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्ट्यांना अन्य अनेक कलाकारही हजर होते. त्यामुळे त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांचीही आता करोना तपासणी करण्यात येणार आहे.गेल्या आठवड्यात अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी आयोजित केलेल्या प्री ख्रिसमस पार्टीमध्ये करिना व अमृता उपस्थित राहिल्या होत्या. या पार्टीत करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, मसाबा गुप्ता हे बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील उपस्थित होते. तसेच ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीलाही करिना आणि अमृता उपस्थित होत्या. करिनाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ती तिच्या दोन्ही मुलांसोबत होम क्वारंटाइन आहे. तर अमृता अरोरा हिलाही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तिलाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून या दोघींचे घर सील केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पार्ट्या आवरा - महापौरनवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. मात्र यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने हॉटेल मालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. करीना आणि अमृता या दोन्ही अभिनेंत्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर पेडणेकर यांनी बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे म्हटले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हॉटेल मालकांनीही खबरदारी घ्यावी, अन्यथा नियम मोडणाऱ्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच २५ ते ३१ डिसेंबर या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अशा पार्ट्याना मुक्त परवानग्या देऊ नका, अशी विनंती त्यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना केली आहे.

टॅग्स :करिना कपूरअमृता अरोराकोरोना वायरस बातम्या