बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान एक नवी इनिंग सुरु करणार, ही बातमी कानावर आली आणि चाहत्यांचा उत्साह दुणावला. होय, काँग्रेसच्या तिकिटावर करिना निवडणूक लढणार, हीच ती बातमी. भोपाळमधून बेबो लोकसभा निवडणूक लढणार, असेही या बातमीत म्हटले गेले. पण बेबो प्रत्यक्षात राजकीय आखाड्यात उतरणार, त्यापूर्वीच आणखी एक बातमी आली. ही बातमी होती, बेबोच्या खुलाशाची. मी राजकारणात जाणार, ही बातमी निव्वळ अफवा आहे, असे बेबोने स्पष्ट केले. राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही. माझे लक्ष्य स्पष्ट आहे आणि ते म्हणजे चित्रपट आहे.
मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नाही. मी कुठल्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही, असे बेबो म्हणाली.मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून करिनाला लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला होता.करिना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याने भोपाळ मतदारसंघ जिंकणे सोपे होईल, असे राजकीय गणित काँग्रेस नगरसेवकांनी मांडले होते.
भोपाळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाकडे आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डाळ शिजत नाही. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडायचे असल्यास करिनाला उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाकडे धरला होता. तरूणाईत करिनाची क्रेज बघता, काँग्रेससाठी हा फायद्याचा निर्णय ठरू शकतो, असेही या नेत्यांचे मत होते. पण आता खुद्द करिनानेच काँग्रेस नेत्यांच्या या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे.तूर्तास करिना करिण जोहरच्या ‘तख्त’ आणि ‘गुड न्यूज’ या सिनेमात बिझी आहे. ‘गुड न्यूज’ या चित्रपटात करिना कपूर व अक्षय कुमार यांचा आॅनस्क्रिन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘तख्त’बद्दल सांगायचे तर हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे.