बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरचा गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला. या चित्रपटात बेबोने साकारलेली वीरेची भूमिका रसिकांना खूप आवडली. त्यानंतर आता करीना आणखीन एक समाजिक कार्य करण्यासाठी पुढे सरसावली आहे. ती लहान गाव आणि शहरांमध्ये जाऊन महिलांना गर्भावस्थेतील सुरुवातीच्या दिवसात काळजी कशी घ्यायची याविषयी जागरुकतेचे धडे देणार आहे.
करीना कपूर बऱ्याच कालावधीपासून युनिसेफच्या साथीने भारतातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत आहे. करीना युनिसेफची गुडविल अँबेसेडर असून लहान मुले आणि महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काम करते आहे. मुलींना शिक्षण मिळावे असे नेहमीच करीना वाटते आणि त्यासाठी ती प्रयत्नही करत असते. भारतामध्ये बऱ्याच अशाही महिला आहेत, ज्यांना गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नक्की काय काळजी घ्यायची? याची कल्पनाही नसते. याच संदर्भात करीना लहान लहान गावांमध्ये जाऊन जागरूकता निर्माण करणार आहे. युनिसेफसह करीना आणखीन एक कँपेन करणार आहे. ज्यामध्ये लहान लहान गाव आणि शहरांमध्ये जाऊन महिलांना गर्भावस्थेतील सुरुवातीच्या दिवसात काळजी कशी घ्यायची याविषयी जागरुकतेचे धडे देणार आहे. करीना स्वतःही एक आई असून महिलांनी आपल्या बाळाला दूध पाजण्याचे महत्त्व तसेच कशा प्रकारे दूध पाजू शकतात या विषयीदेखील माहिती देणार आहे. तसेच गर्भावस्थेत असताना त्रासिक अशा रितीरिवाजांबाबतही करीना या महिलांसमोर भाष्य करणार असून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच, लहान मुलींच्या सुरक्षेबाबतही करीना बोलणार आहे. सध्या भ्रूण हत्या ही सर्वात मोठी समस्या भारतामध्ये आहे. या कँपेननुसार, करीना दर दोन महिन्यांनंतर एकदा लहान शहरात जाणार असून, जास्तीत जास्त मुलांना स्वस्थ आणि चांगले जीवन मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे करीनाने सांगितले आहे.