Join us

करिश्मा - संजय कपूरचा अखेर घटस्फोट

By admin | Published: June 13, 2016 3:22 PM

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाला न्यायालयाने मंजूरी दिल्याने अखेर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 13 - अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाला न्यायालयाने मंजूरी दिल्याने अखेर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. कौटुंबिक न्यायालयात दोघांचा घटस्फोट झाला असून दोघेही आता कायदेशीररिच्या वेगळे झाले आहेत. 
 
करिश्मा कपूरने २००३मध्ये उद्योजक संजय कपूर याच्याशी विवाह केला. मात्र या दोघांमधील वादामुळे हा विवाह फार काळ टिकू शकला नाही. या दोघांनीही २०१४मध्ये एकमेकांपासून सामंजस्याने घटस्फोट घेण्यासाठी वांद्रे कुटुंब न्यायालयात अर्ज केला. मात्र संजय मुलांच्या पालनपोषणासाठी न्यायालयाने ठरवून दिलेली रक्कम देत नसल्याचे कारण देत करिश्माने काहीच दिवसांपूर्वी घटस्फोटासाठी दिलेली संमती मागे घेतली होती. 
 
करिश्मा आणि संजयने सामंजस्याने विवाह संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या अर्जात दोघांनाही मुलांना वाटेल तेव्हा भेटण्याची तरतूद केली होती. तसेच मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ट्रस्ट फंडमध्ये असलेल्या संजयच्या आर्थिक हिश्शातील काही हिस्सा मुलांच्या नावे जमा करण्यासंदर्भातही अर्जात नमूद करण्यात आले होते. तसेच मुले सज्ञान झाल्यावर दोघेही ट्रस्ट फंडचे ट्रस्टी म्हणून जाहीर करण्याची अटही करिश्माने संजयला घातली होती. मात्र नंतर करिश्माला स्वत:लाच ट्रस्ट फंडचे मालकी हक्क हवे होते. भविष्यात मुलांचे आणि संजयचे कोणत्याही प्रकारचे संबंध असू नयेत म्हणून करिश्माने हे पाऊल उचलल्याचे कळले होते.