स्टार प्लसवरील आगामी भव्य मालिका 'कर्णसंगिनी'चे प्रोमो टीव्हीवर दाखल झाले आहेत. हे प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेची तारीख पुढे ढकलली आहे. होय, ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून नवरात्रौत्सव हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
लोक सध्या हा सण साजरा करण्यात व्यस्त असून वाहिनीने सुरूवात पुढे ढकलली आहे. लोकांचे सुरूवातीचे एपिसोड्स पाहणे चुकू नये म्हणून हा सर्व खटाटोप करण्यात आला आहे. लोकांनी अगदी सुरूवातीपासून भव्य प्रकारे हा शो पाहावा असे निर्मात्यांना वाटते. आता ही मालिका नवरात्रीनंतर २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.'कर्णसंगिनी' ही कविता काणे यांची कादंबरी कर्णाज् वाईफः दि आऊटकास्ट क्वीनवर आधारित आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील 'कर्णसंगिनी' या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कर्ण, उरुवी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. कधीही सांगण्यात न आलेल्या कर्ण आणि त्याची जोडीदार उरुवीच्या या कथेमधून सर्व सामाजिक आणि वर्गांच्या मर्यादा लांघणारी प्रेमकथा पाहायला मिळेल. ही मालिका शशी सुमित प्रॉडक्शन्सनी बनवला असून यात अशिम गुलाटी कर्णाच्या रूपात, तेजस्वी प्रकाश ऊरूवीच्या रूपात तर किंशुक वैद्य अर्जुनाच्या रूपात दिसून येणार आहे.