बॉलिवूडच्या इतिहासात आजवर अनेक देशभक्त, खेळाडू यांसारख्या व्यक्तींवर आधारित सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमांच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. यामध्येच सध्या भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारित चंदू चॅम्पियन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
अनेक मालिका आणि सिनेमात झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच 'चंदू चॅम्पियन' या सिनेमात दिसणार आहे. हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती या सिनेमाचा भाग असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
'चंदू चॅम्पियन' या सिनेमात हेमांगीने मुरलीकांत पेटकर यांच्या आईची भूमिका साकारली आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईने खंबीरपणे त्यांची साथ दिली. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये हेमांगीला पाहिल्यापासून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
काय आहे चंदू चॅम्पियनची कथा
‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमात ६० ते ७० चा काळ दाखवण्यात आला आहे. त्यावेळी मुरलीकांत पेटकर हे सैन्यात भरती झाले होते. मात्र, भारत-पाक युद्धात त्यांना गोळ्या लागतात आणि त्यांना कायमचं अपंगत्व येतं. मात्र, या अपंगत्वामुळे ते हार मानत नाहीत. त्याजागी ते पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पॅराऑलम्पिक स्पर्धेत चक्क सुवर्ण पदक पटकावतात.
कार्तिकच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका
या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारत आहे. अलिकडेच त्याने या सिनेमाविषयी भाष्य केलं. या सिनेमात त्याने साकारलेली भूमिका त्याच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं त्याने यावेळी म्हटलं. कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. साजिद नाडियादवाला या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.