बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे. लवकरच त्याचा चंदू चॅम्पियन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तो सातत्याने या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. अलिकडेच कार्तिकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याचं मानधन कमी करण्याविषयी भाष्य केलं आहे.
गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांच्या मानधनात कमालीची वाढ झाली आहे. प्रत्येक कलाकार कोटीच्या कोटी रुपये मानधन म्हणून स्वीकारत आहे. विशेष म्हणजे एकीकडे कलाकार त्यांची फी वाढवत असतांना कार्तिकने मात्र त्याची फी कमी करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर आपल्यासोबत इतरांचाही विचार करायला हवा असंही त्याने म्हटलं आहे.
कार्तिकच्या मानधनात होणार घट
कार्तिकने अलिकडेच 'फिल्म कॅम्पियन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गरज पडल्यास मानधन कमी करेन असं म्हटलं आहे. "जर कोणत्या स्टारला डिजिटल राइट्स, सॅटेलाइट राइट्स किंवा थिएट्रिकल बिझनेसमधून त्याला अपेक्षित रेवेन्यू मिळत असेल तर मला वाटतं तुम्ही चांगल्या मानधनाची अपेक्षा ठेवली तर ते वावगं ठरणार नाही. पण, जर असं होत नसेल तर मग तुम्हाला तुमचं मानधन कमी केलं पाहिजे", असं कार्तिक म्हणाला.
'सगळ्यांचं घर चाललं पाहिजे'
"जगात काहीही घडू दे मी मात्र पैसे कमावणार, मी या मानसिकतेचा नाही. मी एकटाच काम करतोय, एकटाच कमवतोयस असं नाहीये ना. माझे निर्माते, दिग्दर्शक यांना चांगलंच माहितीये आणि माझ्या मते बरेच असे कलाकार आहेत. हे मोठ्या इकोसिस्टमसाठी चांगलं आहे. रिव्ह्यूच्या व्यतिरिक्त आपल्याला बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई करायची आहे. मी कायम माझं मानधन कमी करायला तयार असतो. कारण, एक सिनेमा करण्यासाठी खूप लोकांचा हातभार लागलेला असतो. आणि, त्या प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे. प्रत्येकाच्या हातात काम हवं. प्रत्येक जण दिवसरात्र मेहनत करत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे त्याचा फायदा झाला पाहिजे."
दरम्यान, येत्या १४ जूनला कार्तिकचा चंदू चॅम्पियन हा सिनेमा रिलीज होतोय. यापूर्वी तो 'भूल भुलैय्या 2' मध्ये दिसला होता.