‘कारवां’ स्टार दुलकर सलमान याच्या केरळमधील इव्हेंटमध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला. होय, शनिवारी केरळच्या कोलमच्या कोट्टारकारा येथे एका मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेता दुलकर सलमान हजर होता. दुलकरची एक झलक पाहण्यासाठी हजारोंची गर्दी या मॉलबाहेर जमली होती. इंटरनेटवर या इव्हेंटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते दुलकरची एक झलक पाहण्याची किती अधीर होते, याची कल्पना येते. प्राप्त माहितीनुसार, तिरूवनंतपूरमच्या प्रवंचबलम येथे राहणारा ४५ वर्षांचा हरी हा सुद्धा दुलकरची एक झलक पाहण्यासाठी गर्दीत सामील झाला होत. यादरम्यान गर्दीत त्याला हृदयविकाराचा धक्का आला. त्याला त्वरित रूग्णालयात हलविण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते.
काही मीडिया रिपोर्टनुसार, मॉलबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत हरीचा मृत्यू झाला. अर्थात पोलिसांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. तथापि इतक्या मोठ्या गर्दीला सांभाळण्यासाठीचे योग्य नियोजन व सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव बघता पोलिसांनी या इव्हेंटच्या आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.दुलकरचा ‘कारवां’चा गत शुक्रवारी रिलीज झाला. दुलकर सलमान, इरफान खान आणि मिथिला पारकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर चांगली कमाई करतो आहे. गत शुक्रवारीच रिलीज झालेल्या ‘मुल्क’ आणि ‘फन्ने खां’ या दोन्ही चित्रपटांना मागे सारत या चित्रपटाने आत्तापर्यंत ५ कोटींवर गल्ला जमवला आहे. ‘कारवां’नंतर दुलकी ‘द जोया फॅक्टर’मध्ये दिसणार आहे. यात दुलकर एका क्रिकेट कर्णधाराच्या रूपात आहे. या चित्रपटासाठी दुलकर सध्या क्रिकेटमधील बारकावे शिकतोय. या चित्रपटात तो सोनम कपूरसोबत दिसणार आहे.