Join us

कश्यप तुला भारतीय सोडणार नाहीत- अभिजित भट्टाचार्य

By admin | Published: October 17, 2016 6:59 AM

अनुराग कश्यपला प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17- करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेल्या अनुराग कश्यपला प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत. भट्टाचार्य यांनी ट्विट करून कश्यपला टार्गेट करताना त्याचा एकेरी भाषेत उल्लेख केला. "मोदीजी तुम्ही पुढे चाला, अनुराग कश्यपसारख्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. 'ये लातो के भूत है, बातो से नही मानेंगे'", असं ट्विट करून जोरदार हल्ला चढवला आहे. ते कश्यपला उद्देशून म्हणाले, "एका तुच्छ पाकिस्तानी कलाकारासाठी तू मोदींना प्रश्न विचारतोस, एवढा खालच्या पातळीवर पोहोचलास काय ?, मात्र भारतीय लोक तुम्हा पाकिस्तानवर प्रेम करणा-यांना सोडणार नाहीत, असा इशाराच ट्विटरच्या माध्यमातून अभिजित भट्टाचार्य यांनी अनुराग कश्यपसह पाक कलाकारांची बाजू घेणा-या सर्व अभिनेत्यांना दिला आहे.

 

याआधी कश्यपनं पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांची माफी मागावी, असं ट्विट केलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी मागायला हवी. कारण यादरम्यानच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाची शूटिंग करत होता", असे कश्यपनं ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच्या या वादग्रस्त ट्विटवर नेटिझन्सही अक्षरशः संतापले असून, रिट्विट करून नेटिझन्स त्याच्यावर आगपाखड करत आहेत.

ऐ दिल है मुश्किल या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून मायदेशी जाणं पसंत केलं. मात्र करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. आता तर सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.